यापुढे कोणी हनुमान चालिसा पठण केले तर जाहीर सत्कार करू - देवेंद्र फडणवीस
By गणेश वासनिक | Published: August 21, 2022 07:30 PM2022-08-21T19:30:51+5:302022-08-21T19:31:18+5:30
राज्यात नवे सरकार आले आहे. आता येत्या काळात सण, उत्सव, जयंती जोरात साजरी केली जाईल
अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठण केली तर गुन्हा होता. म्हणूनच खासदार, आमदार राणा दाम्पत्यांना १४ दिवस कारागृहात डांबून ठेवले. पण, मला या दाम्पत्यांचा सार्थ अभिमान आहे. मात्र, यापुढे कोणी हनुमान चालिसा पठण केले तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमरावतीत राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली होती.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात नवे सरकार आले आहे. आता येत्या काळात सण, उत्सव, जयंती जोरात साजरी केली जाईल. यापुढे कोणतेही निर्बंध, सक्ती असणार नाही. आता भ्रष्ट प्रवृतीचे सरकार गेले असून एकनाथ शिंदे आणि माझं सरकार आल्यामुळे आता जनतेला कसं खुले खुले वाटते. दहीहंडी ही हंडी नसून, तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. या हंडीतून निघणारी विकासाची मलई प्रत्येकापर्यंत पाेहचवू असं सांगत फडणवीसांनी खासदार आणि आमदार राणा दाम्पत्यांच्या समाजकार्य, विकासकामांची स्तुती केली.
खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेला ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेता गोविंदा, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, महंत मोहनदादा, आमदार प्रताप अडसड, आमदार रवी राणा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया आदी उपस्थित होते.