विदर्भासह महाराष्ट्रात धुवांधार; पूर्व विदर्भात तीन दिवस अती पावसाचा ऑरेंज अलर्ट
By निशांत वानखेडे | Published: September 4, 2023 06:57 PM2023-09-04T18:57:48+5:302023-09-04T18:58:15+5:30
आतापर्यंत केवळ हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळणाऱ्या मान्सूनच्या आसाचे पूर्व टाेक येत्या दाेन दिवसात दक्षिण गतीने पूर्वमध्य बंगालच्या खाडीकडे सरकत आहे
नागपूर : बारा-तेरा दिवस दडी मारून लाेकांची परीक्षा घेणारा पाऊस पुन्हा सक्रिय हाेण्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात बदललेल्या वातावरणीय स्थितीमुळे ५ सप्टेंबरपासून पुढचे दहा दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात जाेरदार पावसाची शक्यता आहे. त्यातही विदर्भातील काही भागात तीव्र ते अतितीव्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आतापर्यंत केवळ हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळणाऱ्या मान्सूनच्या आसाचे पूर्व टाेक येत्या दाेन दिवसात दक्षिण गतीने पूर्वमध्य बंगालच्या खाडीकडे सरकत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेत असून ते वायव्येकडे भू- भागावर सरकत आहे. साेबत येथील सायक्लाेनिक सर्क्युलेशन ट्रफ तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या किणारपट्टीकडे जात आहे. या बदलामुळे ५ सप्टेंबरपासूर महाराष्ट्रात गडगडाट व चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार आणि मुंबई, काेकण व विदर्भात जाेरदार ते अतिजाेरदार पाऊस हाेऊ शकताे.
५ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यात ५ व ६ सप्टेंबर राेजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासह नागपूर व वर्धा येथे ६ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. पश्चिम विदर्भात अमरावती व यवतमाळ येथे ६ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढचे तीन दिवस येलाे अलर्ट देण्यात आला आहे.
साेमवारी थाेडी उसंत
दरम्यान पूर्व विदर्भातील जिल्ह्यात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री जाेरदार बॅटिंग केली. नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, वर्धा जिल्ह्यात जाेराचा पाऊस झाला तर गाेंदिया, भंडारात हलक्या सरी बरसल्या. साेमवारी दिवसभर चंद्रपूर वगळता सर्वत्र किरकाेळ हजेरी लागली. पाऊस पडला तरी उकाडा मात्र कायम आहे. नागपुरात पारा ३५.२ अंश तर अमरावती ३६.४ अंश, अकाेला ३५.६ अंश, वर्धा ३५ अंश व यवतमाळ ३४.५ अंश तापमान हाेते. त्यामुळे दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.