आजपासून फास्टॅगद्वारेच टोल वसुली, रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:25 IST2025-04-01T10:25:00+5:302025-04-01T10:25:33+5:30
Maharashtra Toll Update: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू १ एप्रिलपासून होणार आहे.

आजपासून फास्टॅगद्वारेच टोल वसुली, रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल
मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू १ एप्रिलपासून होणार आहे. त्यानुसार टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत.
एमएसआरडीसीमार्फत टोल नाक्यांवर फास्टॅगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जात असल्याने दोन मार्गिका हायब्रीड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्युआर कोड, आदींद्वारे टोल स्वीकारला जात होता. मात्र, आज, मंगळवारपासून या हायब्रीड मार्गिका बंद करुन सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसूल केला जाणार आहे.
फास्टॅग स्टीकर लावा
नव्या निर्णयामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
या टोल नाक्यांवर असेल फास्टॅग बंधनकारक
१. वांद्रे वरळी सागरी सेतू
२. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई पुणे जुना मार्ग
३. मुंबई प्रवेशाद्वारावरील पाच टोल नाके
४. समृद्धी महामार्गावरील २३ टोल नाके
५. नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील पाच टोल नाके
६. सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील चार टोल नाके
७. संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील तीन टोल नाके
८. काटोल बायपास
९. चिमूर वरोरा वणी
समृद्धीवर आजपासून १९ टक्के अधिक टोल
मुंबई : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला आज मंगळवारपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धीवरील पथकरात १९ टक्के वाढ केली आहे. परिणामी, कार आणि हलक्या वाहनांना प्रति किमीसाठी सध्याच्या १.७३ रुपयांऐवजी २.०६ रुपये टोल भरावा लागेल. आता मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना १,४४५ रुपये टोल द्यावा लागेल. सध्या नागपूर ते इगतपुरी या प्रवासात १,०८० रुपये टोल भरावा लागतो. मात्र, आजपासून १,२९० रुपये टोल भरावा लागेल. एमएसआरडीसीकडून दर तीन वर्षांनी टोलवाढ केली जाते. नवे टोल दर पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू राहतील.
किलोमीटरनिहाय किती वाढ होणार
वाहन प्रकार (दर प्रति किमी/रुपये) सध्या नवे
कार, हलकी मोटार वाहने १.७३ २.०६
हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बस २.७९ ३.३२
बस अथवा दोन आसांचा ट्रक ५.८५ ६.९७
तीन आसांची व्यावसायिक वाहने ६.३८ ७.६०
अवजड बांधकाम यंत्रसामग्री ९.१८ १०.९३
अति अवजड वाहने ११.१७ १३.३०
रत्नागिरी-नागपूर टोल वाढला
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), अनकढाळ आणि इचगाव (जि. सोलापूर) या तीनही पथकर नाक्यांवर मंगळवारपासून वाढीव दराने पथकर भरावा लागेल. बोरगाव नाक्यावरील पथकर अन्य दोन नाक्यांच्या तुलनेत जास्त आहे. या नाक्यावरील पथकर ६५.९४४ किलोमीटर अंतरासाठीचा आहे.