आंबेडकर भवन पाडल्याविरोधात मोर्चा
By admin | Published: July 6, 2016 09:50 PM2016-07-06T21:50:52+5:302016-07-06T21:50:52+5:30
आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्वस्त केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, १५ जुलैला विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्वस्त केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, १५ जुलैला विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाची सुरूवात होणार
असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर, कॉम्रेड मिलिंद रानडे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे नेते मोर्चाचे नेतृत्त्व करणार आहेत. आंबेडकर भवन पाडणे म्हणजे देशातील चळवळी संपवण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान, आंबेडकर भवनाचा वाद आंबेडकरी नेत्यांनी माध्यमांवर ज्या पद्धतीने हाताळला, त्यामुळे समाजाच्या प्रतीमेस तडा गेल्याची प्रतिक्रिया व्यथित आंबेडकरी युवाने मांडली आहे. आंबेडकरी नेत्यांनी या प्रकरणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, या मागणीसाठी काही तरूण बुधवारी दुपारी दादर येथील चैत्यभूमीजवळ जमले होते.
यावेळी जमलेल्या सर्व युवांनी हातात घोषणा फलक घेऊन शांततेच्या मार्गाने निदर्शने करत ध्यानधारणाही केली. आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना कडक शासन व्हावे, बुद्धभुषण प्रिंटींग प्रेस हेरिटेज वास्तू जाहिर करावी, शिवाय त्याठिकाणी रोहित वेमुला स्मृती दालन निर्माण करावे आणि बाबासाहेबांच्या वारसदारांना ट्रस्टमध्ये सन्मानाचे स्थान द्यावे, अशा विविध मागण्यागी तरूणांनी यावेळी केल्या. दरम्यान, व्यथित आंबेडकरी युवा या समूहाने समाजाच्या भवितव्यासाठी मैत्री-संवाद व मध्यममार्गातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मितीचा संकल्पही यावेळी केला.