पुरंदर, दौंडमध्ये नोटाबंदीविरोधात मोर्चा
By admin | Published: January 7, 2017 01:19 AM2017-01-07T01:19:05+5:302017-01-07T01:19:05+5:30
नोटाबंदीच्या विरोधात आज (दि. ६) संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलने होत आहेत.
सासवड : नोटाबंदीच्या विरोधात आज (दि. ६) संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलने होत आहेत. सासवड येथील तहसील कार्यालयावर पुरंदर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथील स्टेस्ट बँक आणि तहसीलदार सचिन गिरी यांना निवेदन देण्यात आले.
यानंतर झालेल्या सभेत संजय जगताप यांनी, शासनाच्या या निर्णयाबाबत बोलताना, शासनाने निर्णय घेताना पर्यायी व्यवस्था केली. यातून फक्त सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार अडचणीत आला असून यापुढील तीन महिन्यांतही ही परिस्थिती सुधारेल का, याबाबत शंका उपस्थित केली. पुरंदर उपसा योजनेच्या ढिसाळ नियोजनावरही टीका करून यात सुधारणा करण्यासाठी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा दिला.
शासनाने उद्योजकांचे कर्ज राईट आॅफ केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेती वीजपंपांचे बिल माफ करावे, जिल्हा बँकांना पूर्ववत चलनपुरवठा करावा, बँक अधिकाऱ्यांनी गरीब आणि श्रीमंतांना पैसे देताना दुजाभाव करू नये, बँकांतील जमा पैशांवर व्याज द्यावे आणि बँकांच्या रांगेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सासवड येथील काँग्रेसच्या कार्यालयापासून तहसील कचेरीपर्यंत शासनविरोधी घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप धुमाळ, महिलाध्यक्षा भारती गायकवाड, युवक अध्यक्ष विकास इंदलकर, सासवडचे नूतन नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे, शहर काँग्रेसचे रोहित इनामके, सागर जगताप, नंदकुमार जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, संजय जगताप, प्रवीण भोंडे, योगेश गिरमे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
>सामान्य जनतेची पिळवणूक
दौंड : दौंड येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात मोदी सरकारच्या विरोधार्थ घोषणा देण्यात येत होत्या. येथील आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा तहसील कचेरीत गेला.
या वेळी नोटाबंदीच्या निषेधार्थ आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक यासंदर्भात तहसीलदार विवेक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून अचानक बंद केल्या; परंतु त्याच क्षमतेने बँकेत जनतेसाठी नोटा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. तर काही वयोवृद्ध व्यक्ती बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने त्यांना मृत्यू आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर या घटनांना जबाबदार कोण? असे ताकवणे म्हणाले.
या मोर्चात पोपटराव ताकवणे, बाबा शेख, राबिया हुमनाबाद, मालन दोरगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
>मोदी म्हणाले ५0 दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल; मात्र ५0 दिवस उलटून गेले तरी चलन सुरळीत झाले नाही. याचा फटका मात्र गोरगरीब जनतेला बसत आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याकामी लक्ष घालून जनतेची पिळवणूक थांबवावी.
- बाबा शेख,
काँग्रेस शहराध्यक्ष