पुण्यात भाजपाच्या विरोधात पराभूत उमेदवारांचा मोर्चा
By admin | Published: February 28, 2017 04:54 PM2017-02-28T16:54:55+5:302017-02-28T16:54:55+5:30
महापालिका निवडणुकीतील मतदान यंत्रांबाबत शंका असणा-या पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीनेच ही हेराफारी केली असल्याचा आरोप करीत मोर्चा काढला.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - महापालिका निवडणुकीतील मतदान यंत्रांबाबत शंका असणा-या पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीनेच ही हेराफारी केली असल्याचा आरोप करीत मोर्चा काढला. मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढून भाजपाचा निषेध करीत मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले.
उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस) स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, निलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रुपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस) या राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मतमोजणी आधीच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असा अंदाज जाहीर करणारे भाजपाचे खासदार संजय काकडे यांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. त्यांना आधीच निकाल कसा समजला, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या मतांची चोरी करणा-या भाजपचा धिक्कार असो, भाजपाचे खासदार संजय काकडेचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम घोटाळा हिच का भाजपची पारदर्शकता अशा विविध घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अत्यंयात्रा काढण्यात आली. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. फेरनिवडणूकीची मागणी यावेळी पराभूत उमेदवारांनी केली.
भाजपाच्या विरोधात बंड करून पत्नीसाठी शिवसेनेची उमेदवारी घेणारे भाजपाचे नगरसेवक धनंजय जाधव हेही या मोर्चात सहभागी होते. त्यांची पत्नी निवडणुकीत पराभव झाली आहे. लोकशाही मार्गाने विजय मिळणार नाही याची खात्री असल्याने भाजपाने मतदान यंत्रात फेरफार करून हा विजय मिळवला आहे असा आरोप त्यांनी केला.
प्रत्यक्ष झालेले मतदान व मतदान यंत्राद्वारे मोजणी झालेले मतदान याच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यासंबधीची सर्व कागदपत्रे जमा करून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मोर्चातील पराभूत उमेदवारांनी घेतला.