युतीला रोखण्यासाठी आघाडीचा निर्णय
By admin | Published: January 18, 2017 06:55 AM2017-01-18T06:55:11+5:302017-01-18T06:55:11+5:30
स्वतंत्रपणे निवडणुका लढून सत्तेसाठी एकत्र येण्याचा भाजपा-शिवसेनेचा पॅटर्न गेल्या १५ वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेत सुरू आहे.
मिलिंद कुलकर्णी,
जळगाव- स्वतंत्रपणे निवडणुका लढून सत्तेसाठी एकत्र येण्याचा भाजपा-शिवसेनेचा पॅटर्न गेल्या १५ वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेत सुरू आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी दोघांची स्थिती असल्याने, या दोघांच्या भांडणात पडण्यापेक्षा पालिका निवडणुकीतील पराभवातून धडा घेत, दोन्ही काँग्रेसने आघाडीचा सुज्ञ निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या ६७ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी निवडणुका होत आहे. भाजपातर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनेकडून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख के.पी.नाईक, माजी आमदार चिमणराव पाटील, काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील हे नेतृत्व करीत आहेत. चारही पक्षांनी जिल्हा व तालुका मेळावे घेऊन निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे.
नुकत्याच झालेल्या
पालिका निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळविले, त्यापाठोपाठ शिवसेनेने कामगिरी बजावली आहे. दोन्ही काँग्रेसने ज्याठिकाणी आघाडी करून निवडणूक लढविली तेथे यश मिळाले.
१५ वर्षांच्या युतीच्या कार्यकाळात भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद, भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद गाजले होते. गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चौकशादेखील झाल्या. चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या अधिकाऱ्याने चौकशी करुन अहवाल दिला. पोषण आहार, गणवेशवाटप या योजनांमधील गैरव्यवहार उघडकीस आला.