अॅट्रॉसिटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोर्चा
By admin | Published: September 29, 2016 12:22 AM2016-09-29T00:22:32+5:302016-09-29T00:22:32+5:30
अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच राज्यभरातील सर्व तंटामुक्त समित्या कायमच्या बंद कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी व्हीएस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने
लातूर : अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच राज्यभरातील सर्व तंटामुक्त समित्या कायमच्या बंद कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी व्हीएस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने बुधवारी लातुरात मोर्चा काढण्यात आला.
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून या कायद्याअंतर्गत दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, स्वयंघोषित गोरक्षकांच्या नावावर मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवावेत, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या खून प्रकरणाचा तपास तात्काळ लावून आरोपींना शिक्षा करावी आदी मागण्यांसाठी डॉ. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात कुरेशी मुस्लीम समाजबांधव तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तरुण व युवकांची उपस्थितीही लक्षणीय होती. या मोर्चामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)