अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मोर्चा
By Admin | Published: January 29, 2015 05:43 AM2015-01-29T05:43:27+5:302015-01-29T05:43:27+5:30
अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करताना २०१५-१६ साली चौथ्या वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सूट
मुंबई : अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करताना २०१५-१६ साली चौथ्या वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सूट देण्याची मागणी करीत शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. पहिली तीन वर्षे केलेल्या अभ्यासानंतर थेट चौथ्या वर्षी नव्या अभ्यासक्रमाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या एकूण ग्रेडवर त्याचा परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
अभियांत्रिकी शाखेत पहिली तीन वर्षे हा चौथ्या वर्षाचा पाया भक्कम करणारी असतात. त्यामुळे केवळ तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार चौथ्या वर्षी शिक्षण घेण्याची मुभा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे शेवटच्या वर्षी बहुतेक विद्यार्थी कमी गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
याआधीही अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने १९९९, २००४ आणि २००९ साली जुन्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेण्याची सवलत दिली होती. त्याची पुुनरावृत्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. जुन्या अभ्यासक्रमाची मागणी करीत अभियांत्रिकी शाखेतील ६३ महाविद्यालयांतील ३ हजार ५०० विद्यार्थी एकत्र आले आहेत. इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)