पाण्यासाठी महापालिकेवर मोर्चा
By admin | Published: March 7, 2017 02:30 AM2017-03-07T02:30:28+5:302017-03-07T02:30:28+5:30
पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे गावातील शेकडो महिलांनी पनवेल महापालिकेवर धडक देत पाणीपुरवठा सुरळीत करा नाहीतर खुर्ची खाली करा
पनवेल : पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे गावातील शेकडो महिलांनी पनवेल महापालिकेवर धडक देत पाणीपुरवठा सुरळीत करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत मोर्चा काढला होता. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर याचठिकाणी ठाण मांडून बसू असा इशारा महिलांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले व त्यांनी तातडीने दोन वेळेस त्या भागासाठी टँकर पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोकडे पाठपुरावा करून जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवसेना विभागप्रमुख विश्वास पेटकर यांच्या नेतृत्वाखाली वळवली व टेंभोडे गावातील शेकडो महिला पाणी प्रश्नावरून आक्र मक झाल्या होत्या. त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे व बादल्या घेऊन महापालिकेचा निषेध केला. वळवली व टेंभोडे ही गावे महापालिकेच्या हद्दीत येतात. येथील ग्रामस्थ हे प्रकल्पग्रस्त असून त्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत. मात्र सिडकोकडून सोयीसुविधा पुरविण्यात येत नाहीत. कित्येक वर्षापासून या गावांचे प्रश्न प्रलंबित असून सिडकोकडून जलवाहिनीचे काम सुरु असून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने नागरिकांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा व गावातील पाण्याची देखभाल दुरु स्ती स्वत: करून सिडकोचे थांबलेले काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी उपायुक्त मंगेश चितळे यांनी प्राथमिक स्वरु पात पाण्याचे दोन टँकर देण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देतो असे सांगितले आहे. (प्रतिनिधी)