मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या पक्षांपुढे आधी लढाई ‘नोटा’शी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:21 AM2019-03-26T06:21:38+5:302019-03-26T06:22:04+5:30
मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या अनेक पक्षांपुढे याहीवेळी अनामत सुरक्षित ठेवण्यापेक्षा नोटाचेच मोठे आव्हान राहणार आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटानेच अनेक पक्षांचे कपडे उतरविले.
मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या अनेक पक्षांपुढे याहीवेळी अनामत सुरक्षित ठेवण्यापेक्षा नोटाचेच मोठे आव्हान राहणार आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटानेच अनेक पक्षांचे कपडे उतरविले. महाराष्ट्रात गेल्यावेळी ६३ पक्ष आणि इतर अपक्ष मिळून एकूण ८९७ उमेदवार होते. यापैकी तब्बल ६०७ म्हणजे ६८ टक्के उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते पडली. ४४६ पैकी ३७० अपक्षांना नोटाची संख्याही गाठता आली नाही. रायगड आणि हिंगोलीत विजयी उमेदवाराला प्राप्त मताधिक्याहून जास्त मते नोटाला मिळाली.
गेल्या निवडणुकीत आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, लोकभारती, जेडीएस, खोरिपा, इंडिनय युनियन मुस्लिम लीग, तृणमूल काँग्रेस, सीपीआय एमएल, अ.भा. जनसंघ, हिंदू महासभा, शिवराज्य पार्टी यांच्यासह ४० पक्षांचे सर्व उमेदवार नोटाच्याही मागे राहिले. आम आदमी पार्टीचे ४८ पैकी १४ उमेदवार, बसपाचे ४८ पैकी ७ जण, समाजवादी पार्टीचे २३ पैकी २१ उमेदवार, भारिप बहुजन महासंघाचे २३ पैकी १५, रिपाइंचे ८ पैकी ७, गोंगपा व भाकपाचे प्रत्येकी ४ पैकी ३ जण आणि जेडीयूएचे ३ पैकी एक उमेदवाराला नोटाने मागे टाकले होते.
काँग्रेस (२६), भाजपा (२४), राष्ट्रवादी (२१), शिवसेना (२०), माकपा (४), शेकाप (३), स्वाभिमानी पक्ष (२), रासप आणि रिपाइं (ए) (१) या प्रमुख पक्षांना लढलेल्या सर्व जागांवर नोटापेक्षा जास्त मते मिळाली. नागपूर (२९/३३), मुंबई उत्तर (१८/२१), औरंगाबाद (२३/२७), ठाणे (२२/२६), लातूर (१५/१८), परभणी (१४/१७), सोलापूर (३/१६), मुंबई दक्षिण (१६/२०), पुणे (२३/२९), नंदूरबार (७/९), बुलडाणा (१३/१७), मुंबई उत्तर मध्य (१६/२१) आणि मुंबई दक्षिण मध्य (१६/२१) या १३ मतदारसंघात ७५ टक्क्क््यांहून जास्त उमेदवार नोटाच्याही मागे राहिले. नागपुरात तब्बल ८८ टक्के उमेदवार नोटापेक्षा पिछाडीवर होते. नंदूरबारमध्ये नोटाने रेकॉर्डच केला. येथे एकूण ९ उमेदवार होते. विजयी व पराभूत या पहिल्या दोन उमेदवारानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते येथे नोटाला मिळाली. बाकी ७ उमेदवार नोटाच्या मागेच राहिले. अकोल्यात ७ पैकी ५ जणांनी नोटावर मात केली, येथे फक्त दोघेच पिछाडीवर राहिले. नोटाला सर्वाधिक २१ हजारांहून जास्त मते गडचिरोली, पालघर व नंदूरबार या तीन ठिकाणी मिळाली. या तिन्ही जागा आदिवासी राखीव आहेत. नोटाला सर्वांत कमी २३२३ मते बीडमध्ये मिळाली.