डेंग्यू-मलेरियाविरोधात मोर्चेबांधणी

By Admin | Published: September 20, 2016 02:21 AM2016-09-20T02:21:02+5:302016-09-20T02:21:02+5:30

सात वाहन धुम्रफवारणी यंत्रांबाबत मुदतवाढ देण्यास सोमवारी फेरफार समितीच्या बैठकीमध्ये प्रशासकीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.

Frontage against dengue-malaria | डेंग्यू-मलेरियाविरोधात मोर्चेबांधणी

डेंग्यू-मलेरियाविरोधात मोर्चेबांधणी

googlenewsNext


मुंबई : डेंग्यू व मलेरियाविषयक प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता यावी, या दृष्टीने २८५ अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ घेण्याचा आणि सात वाहन धुम्रफवारणी यंत्रांबाबत मुदतवाढ देण्यास सोमवारी फेरफार समितीच्या बैठकीमध्ये प्रशासकीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. तसेच डेंग्यू-मलेरियाबाबत अधिक प्रभावी जनजागृती व्हावी, या दृष्टीने महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नागरिकांना माहिती देणारी प्रदर्शने तातडीने सुरू करावीत, असेही आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी कीटकनाशक खात्याला दिले आहेत.
डेंग्यू - मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही तसेच याबाबत नियंत्रणाच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या सेवा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार ६१४ स्वयंसेवक सध्या कार्यरत आहेत. प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी २८५ इतक्या संख्येने अतिरिक्त स्वयंसेवकांच्या सेवा घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी फेरफार समितीच्या स्तरावर विचाराधीन होता.
या प्रस्तावास महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत २८५ अतिरिक्त कामगार घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी किमान वेतन कायद्यानुसार मानधन संबंधित स्वयंसेवकांना त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या स्तरावर २ कोटी ८५ लाख ५३ हजार १३९ रुपये व ८५ पैसे इतका खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या सर्व सात परिमंडळांमध्ये वाहन धुम्रफवारणी यंत्रांच्या माध्यमातून धुराचीफवारणी केली जाते. या यंत्रांच्या कंत्राटाचा कालावधी वाढविण्यासही सोमवारच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या स्तरावर २९ लाख ३१ हजार ४५६ एवढा खर्च अपेक्षित आहे. डेंग्यू-मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही नागरिकांना त्यांच्या स्तरावर करता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांना डेंग्यू-मलेरियाबाबत माहिती देणारे प्रदर्शन तातडीने सुरू करण्यात यावे, असेही आदेश अजय मेहता यांनी कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
>सर्व विभाग कार्यालयांमध्ये जनजागृतीपर प्रदर्शन सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश
डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधाच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचा निर्णय
६१४ स्वयंसेवक सध्या कार्यरत
२८५ अतिरिक्त स्वयंसेवक घेणार
७ वाहन धुम्रफवारणी यंत्रांस मुदतवाढ
स्वयंसेवकांच्या मानधनासाठी
२ कोटी ८५ लाख ५३ हजार १३९ रुपये व ८५ पैसे
यंत्रांसाठी २९ लाख ३१ हजार ४५६

Web Title: Frontage against dengue-malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.