बोगस नळपाणी योजनेविरोधात जव्हारमध्ये मोर्चा
By admin | Published: May 14, 2017 02:33 AM2017-05-14T02:33:08+5:302017-05-14T02:33:08+5:30
नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली
हुसेन मेमन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली आहे. जागोजागी लागलेली गळती, वापरलेले साहित्य मुदत बाह्य तसेच जुनाट असल्याने ते पाणी घरोघरी पोहचण्या ऐवजी मातीमोल होत आहे. या विरोधात तहाणलेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मोर्चा काढला.
जुना राजवाडा ते पंचायत समिती या मार्गावरुन काढलेल्या या मोर्चामध्ये ग्रामसेवकाने केलेल्या मनमानीचा व ठेकेदाराने केलेल्या कामाजे वाभाडे काढण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या दोन ते तीन तासाच्या बैठकीनंतर प्रशासनानकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन मागे घेतले.
पाण्याची समस्या कायम दुर करण्यासाठी प्रयत्न करावा जेथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल तेथे कायमची पाण्याची व्यवस्था करावी असे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी आवाहन केले होते, मात्र येथील मुजोर अधिकाऱ्यांना विहिरीला पाणी आहे. फक्त दुरूस्ती करायची परंतू तीही यांचे कडून होत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी केली.
कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
वर्ष २०१३ ते २०१६ या काळात पुर्ण झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा दर्जा अगदिच सुमार असल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. शासकीय कामकाजात निविदा प्रसिध्द करतांना काम पुर्ण करण्याची वेळ निश्चित केलेली असते. एखादी नळपाणी योजना असेल तर तिला किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधी असतो. मग ही योजना पुर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच नियमानुसार कालावधीनंतर दरमहा ठरविलेल्या टक्केवारीनुसार दंड आकरण्यात येतो. तो दंडही आकरण्यात यावा व निकृष्ठ केलेल्या काम अंदाजपत्रका नुसार करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विहिरही नादुरूस्त असून तीही तातडीने दुरूस्त करावी तसेच नांदगांव ते टोकरखांड या चार कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामास अग्रक्रम देण्यात आला होता. मात्र आठ महिंने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
>ग्रामसेवकच बनले ठेकेदार
या सर्व बाबींना जबाबदार ग्रामसेवक डि. सी. पाटील मात्र नेहमीप्रमाणे गैरहजर होते. हा सर्व प्रकाराच्या मागे तेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे मांडले आहे. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत, यात बहुतेक ग्रामसेवक ठेकेदार असून कुठलेही कामे ते स्वत: ठेकेदार पध्दतीने करून घेत आहेत. तसेच वाटेल तसे व निकृष्ठ दर्जाचे काम यांचेकडून होत आहेत. त्यांच्या विरोधातील शेकडो लेखी तक्रारी धुळखात असून गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी एकाही ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही.