भिवंडीत रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा
By admin | Published: May 17, 2016 03:28 AM2016-05-17T03:28:30+5:302016-05-17T03:28:30+5:30
भिवंडीतील रिपब्लिकन कार्यकर्ता विकी ढेपे याच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करा
वज्रेश्वरी : भिवंडीतील रिपब्लिकन कार्यकर्ता विकी ढेपे याच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच भाजपा आमदारांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट आणि विरोधी पक्षांनी दलित अन्याय-अत्याचार निवारण कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी भिवंडी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शहरात बंदही पाळण्यात आला. मोर्चादरम्यान पुन्हा दगडफेक झाली.
भाजपाच्या आमदाराविरोधात घोषणा देत धामणकर नाकामार्गे प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी भिवंडी प्रांत अधिकारी संतोष थिटे आणि पोलीस उपायुक्तांना मोर्चेकरांनी निवेदन दिले. त्यात आमदार महेश चौघुले यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, इतर आरोपींना तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अन्वये गुन्हे दाखल करावेत, चौघुले यांची आमदारकी रद्द करावी, विकी ढेपे याच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. त्यावर थिटे यांनी आरोपींना लवकराच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले, तर पोलीस उपायुक्तांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. यावेळी भिवंडीतील धामणकरनाका, कामतघर, ताडाळी, गौरीपाडा, अंजूरफाटा इत्यादी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर इतर ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद होता. (प्रतिनिधी)