‘एटीसीं’कडील कर्मचारी बदलीचे अधिकार गोठविले; आदिवासी विकास विभागाचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 07:23 PM2020-08-13T19:23:29+5:302020-08-13T19:24:44+5:30
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार १५ टक्के कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते.
अमरावती : आदिवासी विकास विभागाने अपर आयुक्तांकडे कर्मचारी बदलींचे असलेले अधिकार गोठविले आहे. आता आयुक्तालयस्तरावर कर्मचा-यांच्या बदल्यांची यादी मंजूर होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे या चारही अपर आयुक्तांना पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या बदलीबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. यंदा कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्यांना ब्रेक लागला आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार १५ टक्के कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर वर्ग ३ आणि वर्ग ४ प्रवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीपात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले. समितीकडून अर्जाची छाननी, पात्र उमेदवारांच्या विनंती अर्जानुसार बदलीचे स्थळदेखील निश्चित झाले.
बदली यादीवर स्वाक्षरी करून उमेदवारांना बदली आदेशपत्र दिले जाणार होते. दरम्यान ११ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास विभागाने अपर आयुक्तांना कर्मचारी बदल्यांचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवावे, असे पत्र धडकले. त्यामुळे अपर आयुक्त स्तरावर झालेल्या बदल्यांची प्रक्रिया आता आयुक्तालयातून होणार आहे. आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे.
हे होते बदलीपात्र कर्मचारी
चारही अपर आयुक्त कार्यालय स्तरावर वर्ग ३ चे कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यात कार्यालय अधीक्षक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहायक, आश्रमशाळांचे शिक्षण आणि गृहपाल आदींचा समावेश होता.
शासनाचे कर्मचारी बदलीसंदर्भात आदेश प्राप्त झाले. चारही अपर आयुक्त कार्यालयातून अद्याप प्रस्ताव मिळाले नाहीत. प्रस्ताव आल्यानंतरच बदल्यांची कार्यवाही होईल.
- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक
आणखी बातम्या...
CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत
शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका