पंधरा दिवसांत ३२०० कोटींची एफआरपी जमा : साखर आयुक्तालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:35 PM2019-02-03T16:35:50+5:302019-02-03T16:37:09+5:30
राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे.
पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफअरपी) शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. शेतकऱ्यांना हंगाम सुरु झाल्यानंतर एफआरपीचे ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये मिळाले आहेत.
कायद्यानुसार शेतकऱ्यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, ३१ डिसेंबर अखेरीसच्या गाळपाआधारे १८५ कारखान्यांपैकी केवळ ११ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिलेली होती. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारीला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले. तसेच, इतर कारखान्यांविरोधातही आरआरसी कारवाईची प्रक्रिया सुरु केली.
दरम्यान, राज्यातील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सुरुवात केली. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरु असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्या पैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ पंधरा दिवसांत कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
शनिवारी (दि. २) झालेल्या ५९ कारखान्यांच्या सुनावणी झाली. सुनावणीपुर्वी या कारखान्यांनी १ हजार ५८० कोटी १४ लाख रुपये एफआरपी दिली होती. सुनावणीच्या दिवशी पर्यंत त्यात आणखी २३८ कोटी रुपयांची भर पडली होती. त्यातील ५ कारखान्यांनी शंभरटक्के एफआरपी दिली आहे.
-----------------------
१५ जानेवारी अखेरची स्थिती ३१ जानेवारी अखेरची स्थिती
गाळप कारखाने १८५ (३१ डिसेंबर अखेरीस) १९० (३१ जानेवारी अखेरीस)
गाळप ऊस (लाख टन) ५४२.४२ (३१ डिसें.) ४२६.८४ (१५ जाने. अखेरीस)
देय एफआरपी कोटींमध्ये १०४७८.३४ (१५ जाने.) १३३०५.६२ (३१ जाने.)
थकीत एफआरपी ५३२०.३६ ४८४१.१५
दिलेली एफआरपी ५१६६.९९ ८४६४.४७
पूर्ण एफआरपी दिलेले कारखाने ११ ११
७१ ते ९१ टक्के एफआरपी दिलेले ४७ ६२
२६ ते ५० टक्के दिलेले २१ ५३
२५ पेक्षा कमी दिलेले २६ १४
शून्य एफआरपी दिलेले २५