‘एफआरपी’साठी कारखान्यांना सूट!
By admin | Published: November 26, 2015 03:21 AM2015-11-26T03:21:39+5:302015-11-26T03:21:39+5:30
‘एफआरपी’ची (रास्त आणि किफायतशीर) रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.
कऱ्हाड : ‘एफआरपी’ची (रास्त आणि किफायतशीर) रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. सरकारचीही तशीच भूमिका आहे. मात्र, साखरेचे भाव कमी असल्याने कारखानदारांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून गतवर्षीप्रमाणे या वर्षीही साखर कारखानदारांना सूट देण्यात येणार असून, खरेदी कर सरकार माफ करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील होते. सहकार, जलसंधारणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी, नागरी आरोग्य, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, शेखर चरेगावकर, सदाभाऊ खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, आज पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. ऊस उत्पादितच झाला नाही तर कारखाने चालणार कसे आणि कारखान्यांपेक्षा शेतकरी महत्त्वाचे आहेत. (प्रतिनिधी )
शंभर गावांमध्ये आठवडी बाजार
राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल चांगल्या दरात विकता यावा म्हणून त्यांनी आपल्या गावात शेतीमालाची साठवणूक करावी. प्रत्येक गावात शेतकरी गट निर्माण करून गावात गोडाऊन निर्माण केल्यास त्यांना शासनाकडून अनुदान दिले जाईल. यासाठी राज्यातील शंभर गावांमध्ये आठवडी बाजार सुरू करणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री पाटील यांनी केली.
सातशे कोटींची मदत देणार - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात गतवर्षी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ पडला होता. तर या वर्षी १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एकीकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी उसाला एकरकमी एफआरपी मिळावा, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे कारखान्यांकडूनही अनुदानाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सातशे कोटी रुपयांची मदत देणार आहोत. नव्वद टक्के उसाचे एफआरपी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.