गत हंगामाएवढीच ‘एफआरपी’ मिळणार
By admin | Published: April 13, 2016 02:44 AM2016-04-13T02:44:07+5:302016-04-13T02:44:07+5:30
आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे.
कोल्हापूर : आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे. कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
कृषी मूल्य आयोगाच्या आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत आगामी २०१६-१७ या हंगामातील ‘एफआरपी’ किती असावी, यावर निर्णय झालेला होता. त्याप्रमाणे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. चालू २०१५-१६ या हंगामासाठी असणारी ‘एफआरपी’ कायम ठेवण्यात आली होती; पण कृषी मूल्य आयोगाने ‘एफआरपी’मध्ये घट केली असून, ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास १४६ रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्या वर्तुळात सुरू होती.
आगामी गळीत हंगामातील ‘एफआरपी’बाबत प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र पाल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एफआरपी’मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आयोगाच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या ‘एफआरपी’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी हंगामात ९.५ उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील टक्क्यास २४२ रुपयेच मिळणार आहेत.
- खासदार राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)