काटकसरीचा सल्ला तरीही उधळपट्टी

By admin | Published: April 4, 2017 01:09 AM2017-04-04T01:09:56+5:302017-04-04T01:09:56+5:30

शहराच्या प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी काटकसरीने कामकाज करणार असे जाहीर केले

Frugal Advice Still Extraordinary | काटकसरीचा सल्ला तरीही उधळपट्टी

काटकसरीचा सल्ला तरीही उधळपट्टी

Next

पुणे : शहराच्या प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी काटकसरीने कामकाज करणार असे जाहीर केले, तरी भारतीय जनता पार्टी या त्यांच्या पक्षाने मात्र महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांच्या नूतनीकरणाचा घाट घालत जोरदार खर्च चालवला आहे. रंगरंगोटी, नव्या खुर्च्या याबरोबरच नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे सांगत दोन दालनांचे एकत्रीकरण करत भले मोठे सभागृहच महापालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आकाराला आणण्यात आले आहे.
साधारण वर्षभरापूर्वीच तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरण करून घेतले होते. त्यासाठी बराच खर्चही केला होता. त्यानंतर महापौरपदी निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी त्यामुळेच आपले दालन आहे तसेच ठेवले. तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मात्र त्या पदावर निवड होताच आपल्या दालनाचे नूतनीकरण केले होते. त्यालाही बराच खर्च करण्यात आला होता.
सर्व दालने जवळपास नवीच असल्याने महापालिका निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजपाकडून दालने आहे तशीच ठेवली जातील असे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर लगेचच या दालनांच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली. नगरसेवकांची संख्या जास्त आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या जुन्या कार्यालयांमधील पार्टिशन काढून एकच मोठा हॉल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पक्षनेत्यांसह सर्वांच्या खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत. सिलिंग व फ्लोअरिंगही बदलण्याचे आदेश भवन रचना विभागाला देण्यात आले आहेत.
त्याशिवाय महापौर तसेच सभागृह नेत्यांच्या दालनातही नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथीलही सर्व आसन बदलण्यात येत आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. आगामी काळात अनेक मोठ्या योजना सुरू होणार असून, त्याला केंद्र व राज्य सरकारची मदत मिळणार असली तरी महापालिकेलाही मोठा वाटा उचलावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
>दालनांचे नूतनीकरण होत असले तरी त्याचा खर्च फार नाही. सत्ताधारी पक्षनेत्यांच्या आदेशाने काम होत आहे. भवन रचना विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद असते. त्यातून हा खर्च होत आहे.
- संदीप खांदवे,
कार्यकारी अभियंता, भवन रचना विभाग
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची छबी
राष्ट्रवादी व काँग्रेस यांची सत्ता होती त्या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे झळकत होती. ती आता काढून टाकण्यात आली असून, सगळीकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे झळकावण्याची तयारी सुरू आहे.
मनसेचे पूर्वी २९ नगरसेवक होते. या वेळी त्यांचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांच्या कार्यालयाची जागा बदलून पूर्वीपेक्षा लहान जागा देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या दालनाचेही नूतनीकरण करण्यात येत आहे.
त्या दालनाची अँटी चेंबर काढून टाकून एकच मोठी जागा करण्यात आली आहे. या दालनातीलही सर्व खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत.

Web Title: Frugal Advice Still Extraordinary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.