फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:18 PM2023-11-21T12:18:15+5:302023-11-21T12:18:45+5:30

धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला.

Fruit crops will get a subsidy of 40 thousand for automatic drip irrigation scheme! | फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

मुंबई :  अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत धनंजय मुंडेंनी कृषी विभागामार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता संपूर्ण देशात प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून  फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गेल्या महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते. संत्रा फळ पिकाची गळती झाली असून, फळ बागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी विनंती अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा आढावा घेत असताना प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. 

कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून, या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याआधीही धनंजय मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम 70 रुपये प्रमाणे अनुदान तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी 100% अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Fruit crops will get a subsidy of 40 thousand for automatic drip irrigation scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.