FTIIच्या विद्यार्थ्यांना ३ वर्षांपेक्षा अधिक काळ वसतीगृहात राहता येणार नाही - गजेंद्र चौहान
By admin | Published: June 23, 2016 02:24 PM2016-06-23T14:24:19+5:302016-06-23T14:29:01+5:30
‘एफटीआयआय’च्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना ३ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - ‘एफटीआयआय’च्या (फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ) वादाचे केंद्रबिंदू ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘एफटीआयआय’च्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना ३ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. चौहान यांच्या या वक्तव्यामुळे ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत.
आणखी बातम्या :
‘एफटीआयआय’मध्ये ३ वर्षांचा ‘सेमिस्टर’ प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षात विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करु शकले नाहीत, तर एक वर्ष वाढवून दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच ३ वर्षांचे शुल्क घेतो. त्यामुळे वाढविलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये राहता येणार नाही. याबाबत विद्वत्त परिषदेमध्ये निर्णय झाला आहे. आता प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले.
आणखी बातम्या :
दरम्यान, गुरुवारी सकाळी गजेंद्र चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. ‘एफटीआयआय’च्या वादानंतर त्यांनी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली. याबाबत विचारणा केली असता सरसंघचालक मला पित्यासारखे आहेत. त्यामुळेच मुलाच्या लग्नाचे पहिले आमंत्रण सरसंघचालकांना देण्यासाठी आलो असल्याचे चौहान यांनी सांगितले.