‘पुढील काळात मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा’
By admin | Published: January 18, 2017 02:24 AM2017-01-18T02:24:20+5:302017-01-18T02:24:20+5:30
इंधनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असून तेल उत्पादक कंपन्यांनीही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : इंधनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असून तेल उत्पादक कंपन्यांनीही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला येत्या काळात मोठा इंधन तुटवडा जाणवणार असून आतापासून इंधन बचत व संवर्धनासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी केले.
केंद्र शासनाचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, तेल उद्योगांचे राज्य समन्वयक व पेट्रोलियम संवर्धन संशोधन असोसिएशनतर्फे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘सक्षम’ (संरक्षण क्षमता महोत्सव) चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कुलाबा येथील महानगरपालिकेच्या शाळेत पार पडला. या वेळी पाठक बोलत होते. याप्रसंगी पीसीआरएचे विभागीय संचालक रॉय चौधरी, तेल उद्योग समन्वय समितीचे विभागीय समन्वयक बी. के. सिंग, महाराष्ट्र समन्वयक ए. एल. कृष्णन, हिंदुस्थान पेट्रोलियमचे के. श्रीनिवास, शुभांकर सेन, सिद्धार्थ पांडा, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक अमरसिंह मगर उपस्थित होते. पाठक म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थाचा योग्य वापर करणे तसेच सौरऊर्जा, जैवऊर्जा, पवनऊर्जा आदी पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. इंधन बचत व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे पाठक म्हणाले. या वेळी इंधन बचतीसाठी व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन व मानवी साखळी बनवून इंधन बचतीचा संदेश दिला. (प्रतिनिधी)