फुगेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला
By Admin | Published: May 20, 2016 02:36 AM2016-05-20T02:36:47+5:302016-05-20T02:36:47+5:30
आज तुझा मर्डर आहे, असे सांगून डोळ्यांत मिरची पूड टाकून शरीरावर धारधार शस्त्राचे वार केले.
पिंपरी : आज तुझा मर्डर आहे, असे सांगून डोळ्यांत मिरची पूड टाकून शरीरावर धारधार शस्त्राचे वार केले. तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फुगेवाडीत बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी रमेश इराण्णा बाली (वय २०), मल्लेश व्यंकप्पा बागड (रा. ओमकारनगर, काटे वस्ती) या दोन आरोपींविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फुगेवाडी जकात नाक्याजवळ बुधवारी घडली. निहाल ऊर्फ सोन्या पवार (वय २२, फुगेवाडी) या फिर्यादीला दोन आरोपींनी मारहाण केली. मिरची पूड फिर्यादीच्या तोंडावर टाकली.
आरोपी रमेश बाली याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. मल्लेश बागड याने छातीवर दगड मारून निहाल यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
सुपरवायझरकडून ५३ हजारांचा अपहार
पिंपरी : खासगी कंपनीत सुपरवायझरचे काम करणाऱ्या व्यक्तीने कामगारांसाठी दिलेल्या ५३ हजार ४७० रुपये रकमेचा अपहार केला, अशी फिर्याद सोनाली नायक (वय ३२, येरवडा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील वसंत मारणे (वय ३०, वारजे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वाधवानी इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या सोनाली नायक यांनी सुपरवायझरविरोधात फिर्याद दिली आहे. कामगारांसाठी बँकेत भरणा करण्यास दिलेल्या ५३ हजार ४ ७० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे.
चिंचवडगावात ट्रकचालकाला लुबाडले
पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी शकुल खान (वय ६२, रा. उत्तर प्रदेश) या ट्रकचालकास अडवले. त्याच्या खिशातील रोख ११ हजार रुपये, मोबाइल असा एकूण १३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ट्रकचालकाला लुटण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकुल खान हे ट्रकचालक मूळचे उत्तर प्रदेशचे असून, ते माल घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चापेकर चौकातील पुलावर त्यांचा ट्रक अडवला. ट्रकचालकासह त्याच्या मुलाला मारहाण करून पैसे, मोबाईल लंपास केला.