फरार डॉक्टर खिद्रापुरेला अखेर अटक

By admin | Published: March 7, 2017 11:51 PM2017-03-07T23:51:37+5:302017-03-07T23:51:37+5:30

म्हैसाळमधील भ्रूणहत्या प्रकरण : शेतात लपविलेले क्ष-किरण यंत्र जप्त

Fugitive doctor arrested in Khidrapurra | फरार डॉक्टर खिद्रापुरेला अखेर अटक

फरार डॉक्टर खिद्रापुरेला अखेर अटक

Next

सांगली/मिरज/म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बेकायदा गर्भपात केंद्र चालवून भ्रूणहत्या करणारा व गेल्या चार दिवसांपासून गुंगारा देत फरारी असलेला डॉक्टर बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे (वय ४२, रा. कनवाड, ता. शिरोळ, सध्या म्हैसाळ) हा सोमवारी रात्री उशिरा मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने म्हैसाळमध्ये एका शेतात लपविलेले क्ष-किरण यंत्रही पोलिसांनी मंगळवारी जप्त केले.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यामुळे खिद्रापुरेचे बेकायदा गर्भपात केंद्र उघडकीस आले होते. तसेच खिद्रापुरे याने म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरलेले १९ भ्रूण पोलिसांनी शोधले होते. पोलिसांची धडक कारवाई सुरु झाल्यानंतर खिद्रापुरे फरारी झाला होता. त्याने सोमवारी मध्यरात्री मिरजेत येऊन पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पहाटे त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात त्याला मिरजेतील न्यायालयात हजर करण्यात आले. खिद्रापुरे याने केलेले अवैध गर्भपात व त्याच्या ‘रॅकेट’मध्ये सहभागी असणाऱ्या साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याने त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खिद्रापुरेने म्हैसाळमध्ये काकासाहेब चौगुले यांच्या शेतात सटवाई मंदिराजवळ कडब्यात क्ष-किरण यंत्र लपवून ठेवले होते. हे यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातून यापूर्वी क्ष-किरण यंत्र, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन्स, भुलीच्या औषधांचा साठा, महत्त्वाची कागदपत्रे व संगणक, गर्भपातासाठी आलेल्या महिलांच्या नावांचे रेकॉर्ड जप्त केले आहे.
खिद्रापुरेने होमिओपॅथी पदवी असताना स्त्री भ्रूणहत्येसाठी महिलांच्या अवैध शस्त्रक्रिया केल्या असून, या कामात त्याने सांगली, मिरजेतील काही डॉक्टर व स्वत:च्या पत्नीची मदत घेतल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे येत आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु ठेवला आहे. दरम्यान आ. सुरेश खाडे यांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन, म्हैसाळप्रकरणी खिद्रापुरे याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. (प्रतिनिधी/वार्ताहर)

विशिष्ट गोळी देऊन गर्भपात : शिंदे
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले, खिद्रापुरेच्या मागावर चार पथके रवाना केली होती. पथकांनी चारही बाजूने त्याची नाकेबंदी केली होती. त्याला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या ‘रॅकेट’मध्ये कोणा-कोणाचा सहभाग होता, याचा लवकरच उलगडा केला जाईल. गर्भपात करण्यापूर्वी तो महिलांना विशिष्ट प्रकारची एक गोळी सेवन करण्यास देत असे. गर्भपात होण्यासाठी तो तीन तास प्रतीक्षा करायचा. गर्भपात झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्या महिलेला जाण्यास सांगत होता. तपास प्राथमिक स्तरावर आहे. खिद्रापुरे आता अटकेत असल्याने पुढील तपासाला गती मिळेल. परिस्थितीजन्य व शास्त्रीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

रहाटकर यांची भेट
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी म्हैसाळ येथे भेट देऊन खिद्रापुरेच्या रुग्णालयाची पाहणी केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात रहाटकर यांनी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्याशी तपासाबाबत चर्चा करुन माहिती घेतली. तसेच स्वाती जमदाडे हिच्या खंडेराजुरी (ता. तासगाव) येथील नातेवाईकांची रहाटकर यांनी भेट घेतली. मंगळवारी ग्रामस्थांनी म्हैसाळ बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉक्टर, एजंटांचा शोध
खिद्रापुरे याच्या रूग्णालयात सांगली-मिरजेतील काही स्त्रीरोगतज्ज्ञ शस्त्रक्रियेसाठी येत होते. रुग्णालयात सापडलेल्या नोंदीवरुन या संबंधित डॉक्टरांची चौकशी होणार आहे. गर्भपात व लिंगनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी यंत्र खिद्रापुरे याने लपविल्याचा संशय आहे. लिंगनिदान करणाऱ्या अन्य डॉक्टरांचा शोध सुरु आहे. खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रूपये दर होता. जिल्'ासह कर्नाटकातील महिला मोठ्या संख्येने त्याच्याकडे गर्भपातासाठी येत होत्या. खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या एजंटांचा पोलिस शोध घेत आहेत.


आरोग्य विभाग
दोषी : रहाटकर
डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचे बेकायदा गर्भपात केंद्र सुरू राहण्यामागे आरोग्य विभाग दोषी आहे, अशी स्पष्ट कबुली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी सांगलीत दिली.-
अनेक प्रथितयश डॉक्टर
मुंबई : म्हैसाळ येथील भ्रूण हत्या प्रकरणात कोल्हापूर, मिरज, सांगलीतील काही प्रथितयश डॉक्टर सामील असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.-/वृत्त ५

अवशेषांची डीएनए तपासणी
खिद्रापुरेविरूद्ध विनापरवाना, विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय केल्याबद्दल बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट, वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट, ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्टअंतर्गत आरोग्य विभाग कारवाई करणार आहे. डॉ. खिद्रापुरे याने पुरलेल्या स्त्री भ्रूणांच्या अवशेषांची डीएनए तपासणी केली जाणार आहे. यामध्ये हे भ्रूण स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाल्यास लिंगनिदान कायद्याच्या उल्लंघनाचा स्वतंत्र गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल केला जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती खिद्रापुरेच्या कृत्यांची चौकशी करीत आहे.

Web Title: Fugitive doctor arrested in Khidrapurra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.