फडणवीस यांना दिलेला शब्द खरा केला : प्रसन्न मोहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:16 IST2025-03-21T11:16:45+5:302025-03-21T11:16:59+5:30
न्यूज १८ लोकमतच्या अँकर ज्ञानदा कदम हिने मोहिले यांची छोटेखानी मुलाखत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात घेतली.

फडणवीस यांना दिलेला शब्द खरा केला : प्रसन्न मोहिले
मुंबई : विदर्भातील शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना व आर्थिक समस्या कमी करण्यासाठी पेर्नोड रिकार्ड इंडिया या कंपनीतर्फे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नागपूरमध्ये करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मित्राला दिलेला शब्द प्रत्यक्षात आणला. पहिल्या टप्प्यातील ही गुंतवणूक असून, उत्पादनासाठी सहा हजार टन बार्लीची, ४० हजार एकर जमिनीची गरज असून, या उद्योगाचा फायदा विदर्भातील ९० हजार शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पेर्नोड रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड, कॉर्पोरेट अफेअर्स प्रसन्न मोहिले यांनी बुधवारी व्यक्त केला. न्यूज १८ लोकमतच्या अँकर ज्ञानदा कदम हिने मोहिले यांची छोटेखानी मुलाखत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात घेतली.
मोहिले म्हणाले की, भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर नाशिकच्या दिंडोरी येथील कंपनीपासून पेर्नोड रिकार्ड इंडियाची सुरुवात झाली. आज ३० ठिकाणी कारखाने आहेत. राष्ट्रीय सकल उत्पादनात ४० हजार कोटी रुपयांची भरभक्कम भर घालणाऱ्या या उद्योगातील आमच्या कंपनीने महाराष्ट्राला चार लाख कोटींचा महसूल दिला आहे. मक्यापासून होणाऱ्या उत्पादनासाठी ५० हजार मेट्रिक टन मक्याची गरज असते. एक लाख एकर क्षेत्रावर मक्याचे उत्पादन लागते. त्यामुळे आमची कंपनी केवळ महसूल नव्हे तर, रोजगारही मिळवून देते. एकूण नऊ लाख रोजगारनिर्मिती करताना सहा लाख रोजगार कृषी क्षेत्रात निर्माण होतील.
मोहिले म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ४० वर्षे जुनी मैत्री आहे. फडणवीस प्रथम आमदार झाले तेव्हा एक दिवस माझ्याकडे आले. माझ्या मोटारीत बसून आम्ही निघालो. ते मला गडचिरोलीला घेऊन गेले. फडणवीस यांना गडचिरोलीतील आरोग्य केंद्रांबाबत तारांकित प्रश्न विचारायचा होता. त्यांची गोरगरिबांच्या प्रश्नांबाबतची तळमळ मला तेव्हा भावली, असेही ते म्हणाले.