आशियाई-पॅसिफिक रॅली संजयकडून पूर्ण
By admin | Published: June 21, 2016 03:07 AM2016-06-21T03:07:06+5:302016-06-21T03:07:06+5:30
वादळी पावसाचा सामना करीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेतील क्वीन्सलँड रॅली पूर्ण करण्याची कामगिरी केली
पुणे : वादळी पावसाचा सामना करीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेतील क्वीन्सलँड रॅली पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्याने चौथ्या क्रमांकासह २० गुणांची कमाई केली. दरम्यान भारताच्याच गौरव गीलने सर्वाधिक ७७ गुणांसह रॅलीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
आॅस्ट्रेलियातील सनशाईन कोस्टवर ही रॅली पार पडली. पावसामुळे मार्ग धोकादायक झाल्याने अखेरच्या चार स्टेज रद्द करण्यात आल्या. शनिवार व रविवार अशा दोन दिवशी झालेल्या या रॅलीच्या प्रॉडक्शन करंडक गटात संजय सहभागी झाला होता. चौथ्या क्रमांकाचे १२ व ८ बोनस गुण त्याला मिळाले.
न्यूझीलंडमध्ये व्हांगारेई रॅली ही पहिली फेरी पार पडली. त्यात पहिल्या दिवशी इलेक्ट्रिक बिघाड, तर दुसऱ्या दिवशी पूल पार करताना कार घासल्यामुळे संजयला माघार घ्यावी लागली होती. यामुळे ही रॅली किमान पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट त्याने ठेवले होते. ते त्याने साध्य केले.
संजयने जपानच्या कुस्को संघांचे प्रतिनिधित्व केले. संजयने सांगितले की, ‘‘आव्हानात्मक रॅली पूर्ण केल्याने समाधान वाटते. मार्ग ओला व
निसरडा होता. मुळातच खडतर असलेला मार्ग पावसामुळे आणखी आव्हानात्मक ठरला. त्यामुळेच रॅली पूर्ण करणे महत्त्वाचे ठरले. तर ११व्या स्पेशल स्टेजला आमच्या कारचा ड्राइव्ह शाफ्ट तुटला, पण कार नीट चालवीत आम्ही रॅली पूर्ण होईल, याची काळजी घेतली. जेवणाच्या वेळेत कुस्को संघाने कार सुसज्ज केली. त्यानंतर पुन्हा पंक्चरमुळे समस्या निर्माण झाली होती. कुस्को संघाच्या तंत्रज्ञांनी चांगली कामगिरी बजावली.’’ (क्रीडा प्रतिनिधी)
दुसऱ्या फेरीनंतरचे गुण (सर्वसाधारण) :
गौरव गील (एमआरएफ स्कोडा, भारत-७७ गुण), फॅबियन क्रेइम (एमआरएफ स्कोडा, जर्मनी-६१), मायकेल यंग (कुस्को रेसिंग, न्यूझीलंड ५०), संजय टकले (कुस्को रेसिंग, भारत २०).
पहिल्या दिवशी आम्ही जपानच्या फुयुहिको ताकाहाशीपेक्षा सरस कामगिरी केली. मार्क बिअर्डपेक्षा काही सेकंदांनीच मागे होतो. त्याच वेळी ड्राइव्ह शाफ्ट तुटला. सुदैवाने पाच किलोमीटरचीच स्टेज होती. त्यानंतर १४ किलोमीटरचा ट्रान्सपोर्ट सेक्शन होता. एक चाक घासत होते. यामुळे दोन मिनिटे वाया गेली. - संजय टकले