मनोरुग्णालयाला पूर्णवेळ अधीक्षक
By admin | Published: October 19, 2016 04:23 AM2016-10-19T04:23:56+5:302016-10-19T04:23:56+5:30
दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधीक्षकपदी पुण्याचे वैद्यकीय सहायक संचालक डॉ. दिनकर रावखंडे यांची नियुक्ती झाली आहे.
ठाणे : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधीक्षकपदी पुण्याचे वैद्यकीय सहायक संचालक डॉ. दिनकर रावखंडे यांची नियुक्ती झाली
आहे. रावखंडे यांच्या नियुक्तीमुळे तब्बल सात वर्षांनंतर मनोरुग्णालयास पूर्णवेळ अधीक्षक लाभला आहे.
पुणे जिल्ह्यापाठोपाठ ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय हे सर्वात मोठे मनोरुग्णालय
आहे. अलिबाग, मुंबई, ठाणे,
नाशिक, धुळे, पालघर, रायगड, नंदुरबार हे आठ जिल्हे या रुग्णालयाशी जोडले गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत या रुग्णालयात १५३१ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या रुग्णांच्या तुलनेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमीच आहे.
मुख्य म्हणजे गेल्या सात वर्षांपासून अधीक्षकपद रिक्त होते. या कालावधीत हे पद प्रभारी म्हणून सोपवले जात होते. प्रभारी अधीक्षक आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शिरसाट यांची आॅगस्ट महिन्यात बदली झाल्यापासून नवीन अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. वैद्यकीय सहायक संचालकपदावरून कार्यमुक्त झाल्यावर रावखंडे अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. (प्रतिनिधी)
>सात वर्षांनंतर
पूर्णवेळ अधीक्षक
मनोरुग्णालयात २००९ साली डॉ. सुलभा माळवे यांनी अधीक्षकपदाचा कार्यभार सोडल्यानंतर २०१६ पर्यंत चार प्रभारी अधीक्षकांनी कार्यभार सांभाळला.
त्यामध्ये डॉ. संजय कुमावत, डॉ. विलास नलावडे, डॉ. राजेंद्र शिरसाट आणि त्यानंतरचे अडीच महिने डॉ. गुटे यांचा समावेश आहे.