आतशबाजीची हौस अंगाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 05:19 AM2016-11-02T05:19:14+5:302016-11-02T05:19:14+5:30
लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवसांत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजीची हौस १७७ जणांना चांगलीच महागात पडली
ठाणे : लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवसांत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजीची हौस १७७ जणांना चांगलीच महागात पडली आहे. फटाके फोडून ध्वनिप्रदूषणासह वायुप्रदूषण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी
दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंबंधी आवाजाची मर्यादा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी ठरवून दिली होती. तर दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा पाळा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिला होता. त्याप्रमाणे रविवारी आणि सोमवारी फटाके फोडणाऱ्या १७७ जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अॅक्ट अधिनियमानुसार गुन्हे नोंदवले आहेत. ही कारवाई ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये केली आहे. रविवारी दिवसभरात ८७ तर सोमवारी ९० जणांविरोधात कारवाई केली. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांच्याकडून १२०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेऊन सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>न्यायालयीन आदेशानुसार आवाजांच्या मर्यादेचा तक्ता
झोनची वर्गवारी डेसीबल मर्यादा
दिवस/ रात्री
औद्योगिक क्षेत्र७५/ ७०
वाणिज्य क्षेत्र६५/५५
निवासी क्षेत्र५५/४५
शांतता क्षेत्र५०/४०
> २१ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल
रॉकेट, बॉम्ब आदी फटाक्यांवर बंदी असताना, तसेच शहर पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाच्या भंग करून त्यांची घोडबंदर रोड परिसरात विक्री करणाऱ्या २१ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून जवळपास ६५ हजारांचे फटाके जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कासारवडवलीचे पोलीस नाईक प्रवीण घोडके यांनी दिलेल्या तक्रारीत भानुदास पाटील, कुंदन पाटील, प्रकाश पाटील, विनोद ठाकरे, संजय जाधव, जगन्नाथ पाटील आणि राकेश शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून २,०४० रुपयांचे फटाके तर कासारवडवलीचे पोलीस नाईक जयेश तामोरे यांनी दिलेल्या तक्रारीत कांतीलाल गवळी, सुधीर गुरखा, मनोज शिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील १९ हजार ९९१ रुपयांचे तसेच कासारवडवलीचे पोलीस नाईक अमोल साळवी यांनी नोंदवलेल्या तक्रारीत, दिनेश पटेल, नागेश सोळंके, संगीता चव्हाण, दामाजी पटेल, संतोष पिंगळे यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १ हजार ७०० रुपयांचे फटाके जप्त केले.
त्याचबरोबर कासारवडवलीचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी नोंदवलेल्या तक्रीरात, महेंद्र वाघ, मृत्युंजय प्रजापती, ज्ञानेश्वर पाटील, रवजी पटेल, अजय मढवी आणि अर्जना पावले यांच्याकडून ३९ हजार ६४३ हजारांचे फटाके जप्त केले. या चार गुन्ह्यांतील एकूण २१ यांच्याविरोधात भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.