‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी नाटकातून निधीसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:00 AM2017-09-18T01:00:43+5:302017-09-18T01:00:43+5:30
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एखाद्या लोकप्रिय साहित्यकृतीचा इतिहासदेखील तितकाच रोचक असू शकतो हे ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीच्या जन्मकथेवरून दिसून येते. तब्बल ५० वर्षांपूर्वी ही कादंबरी छापण्यासाठी आर्थिक चणचण असताना ज्या शाळेत शिवाजीराव शिकले, त्या आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून त्यातून निधी उपलब्ध करून दिल्याची रोचक माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रयोगासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदन उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगांवकर यांना पाठविले होते. तेथील कागदपत्रांमध्ये हे निवेदन मिळाले आहे. शिवाजीराव सावंत यांचा आज, सोमारी स्मृतिदिन आहे. यानिमित्त ही आठवण निश्चितच या शिक्षक आणि विद्यार्थी नात्यावर प्रकाश टाकणारी अशीच आहे, असे म्हणावे लागेल.
१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेट यातून शिवाजीरावांनी या कादंबरीचे लेखन केले. मात्र, प्रकाशनासाठी मोठा खर्च येणार असल्याने शिवाजीराव चिंतेत होते. ही बातमी ते ज्या शाळेत शिकले त्या आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या शिक्षकांना समजली.
आपल्या माजी विद्यार्थ्याची ही साहित्यकृती प्रकाशित व्हावी यासाठी शिक्षकांनी कंबर कसली. मात्र, तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हते. अखेर सर्वांनी मिळून एक नाटक सादर करायचे ठरविले आणि त्यातून मिळणारा निधी या कादंबरीच्या प्रकाशनासाठी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार बाळ कोल्हटकरलिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक बसविण्यात आले.
त्यातून जमा झालेला निधी सावंत यांना देण्यात आला. त्यानंतर सन १९६७ च्या गणेशचतुर्थीला ‘मृत्युंजय’चं पूजन आणि प्रकाशन झालं. त्यानंतर घडला तो इतिहास. केवळ तीन महिन्यांत तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि आजतागायत ‘मृत्युंजय’वरचं वाचकांचं प्रेम कमी झालेलं नाही हे वास्तव आहे.
१ ते ७ रुपये तिकीट
या नाटकासाठी खुर्चीचे दर ७, ५ आणि ३ व २ रुपये असे ठेवण्यात आले होते, तर पीटातील प्रेक्षकांसाठी व महिलांसाठी १ रुपया तिकीट ठेवण्यात आले होते.
अन्य शाळांनाही आवाहन
व्यंकटराव हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांनी या उपक्रमाला तालुक्यातील इतर शिक्षण संस्थांनीही हातभार लावावा यासाठी पत्रव्यवहार केला. उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक, सचिव अनंतराव आजगावकर यांना दि. २९ एप्रिल १९६७ रोजी व्यक्तिगत पत्र लिहून या प्रयोगाची तिकिटे घेण्याबाबत विनंती केली होती.
शिक्षकांनीच केल्या भूमिका
या नाटकामध्ये मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री बा. मा. कुलकर्णी, आप्पासाहेब निर्मळे, वसंतराव गायकवाड, नारायण डोणकर, शिवाजी पाटील, सिनेतारका अलका इनामदार, सरोजिनी सुखटणकर यांनी भूमिका केल्या. ग्रामीण भागात त्यावेळी मुली, महिला नाटकात काम करत नसत. त्यामुळे या दोघींना पाचारण करण्यात आले होते. या नाटकाला दिनकर पोवार यांनी संगीत दिले होते.