भाजपच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:36 AM2020-03-07T11:36:16+5:302020-03-07T11:37:57+5:30
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाला महागाई वाढवणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याकडे लक्ष वेधले.
मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या धरणे आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय झाल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पाटील यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासनाप्रमाणे मदत देणे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे या मागण्या अद्याप शिल्लक आहे. अर्थसंकल्पापूर्वी भाजपने केलेली धरणे, आंदोलने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र उर्वरित मागण्यांसाठी भाजप लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाला महागाई वाढवणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याकडे लक्ष वेधले. यावेळी पाटील यांनी पेट्रोल आणि डीजेलवर प्रतिलीटर एक रुपायाने केलेल्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे म्हटले. तसेच वाहतूक खर्चात वाढ झाल्याने महागाई वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी वीस हजार कोटींची आवश्यकता असताना मराठवाड्याला केवळ दीडशे कोटी रुपये जाहीर केले आहेत. तर ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दीड हजार कोटींची तुटपुंजी तरतूद केली असून महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प ठोस काहीच देणारा नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.