महाराष्ट्राला निधी द्या; आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी, तीन हजार कोटींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 08:46 AM2021-08-03T08:46:06+5:302021-08-03T08:49:38+5:30
Maharashtra News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.
नवी दिल्ली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह खा. विनायक राऊत, माजी मंत्री अरविंद सावंत, प्रियंका चर्तुेवेदी, कृपाल तुमाने, फौजिया खान, सुनील तटकरे आदींनी सीतारामन यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक त्रस्त असताना विमा कंपन्यांकडून त्यांची छळवणूक करण्यात येत आहे. ती ताबडतोब थांबवावी, राज्यासाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा.
केंद्राचे पथक पाठवून आढावा घ्या
खा. राऊत म्हणाले, पुरामुळे वाहनांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे; पंरतु विमा कंपन्या विमा राशी देण्यात टाळाटाळ करीत आहेत. अनेकांच्या वाहनांची कागदपत्रे पुरात वाहून गेली आहेत. अशात केंद्राने पूरग्रस्तांसाठी विम्यासंबंधीचे नियम बदलावेत. राज्याकडून मागण्यात आलेल्या मदतीसंबंधी केंद्रीय पथक पाठवून आढावा घ्यावा. राज्याला एनडीआरएफचा अतिरिक्त निधी मिळावा यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र वेळ मागण्यात आली आहे.