निधीसाठी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या खिशात हात
By admin | Published: January 18, 2017 02:29 AM2017-01-18T02:29:21+5:302017-01-18T02:29:21+5:30
साहित्य संमेलनात सहभागी होण्याची सक्ती मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना करायची
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- साहित्य संमेलनात सहभागी होण्याची सक्ती मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना करायची आणि त्या भरपगारी रजेचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी तीन हजार रुपये शुल्क आकारून संमेलनाचा खर्च भरून काढायचा असा प्रस्ताव साहित्य महामंडळाने आयोजकांपुढे मांडला आहे. याशिवाय संमेलनाच्या दिंडीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा रुपये गोळा करण्याचा विचार सुरू आहे. ही रक्कम संमेलनाच्या खर्चासाठी वापरली जाणार आहे. त्याचवेळी साहित्य महामंडळाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संमेलनाच्या ठिकाणी जागोजागी दानपेट्या ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे.
निवडणूक आचारसंहितेचा फटका बसल्याने निधीची चणचण भासत असलेल्या आयोजक आगरी युथ फोरमने या सूचनेचा विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कितीही काटकसरीने संमेलन केले तरी काही कोटींचा खर्च करावाच लागेल. पण त्यासाठी पुरेसा निधी गोळा होत नसल्याबद्दल महामंडळ आणि आयोजकांची रविवारी बैठक पार पडली. त्यात ही सूचना करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने १० रुपये दिल्यास चांगला निधी होऊ शकतो, अशी कल्पना पुढे आली आहे. या संमेलनाचा आपणही एक भाग होतो, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहावी यासाठी या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा रुपये गोळा केले जाणार आहेत. संंमेलनाच्या दिंडीत १५ हजार विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा निधी गोळा होईल, असा महामंडळाचा अंदाज आहे. हे शुल्क संमेलनासाठी वापरले जाणार आहे.
>सुरक्षेच्या गराड्यात पेट्या
साहित्य संमेलनाच्या ठिकाणी दानपेट्या ठेवल्या, तर माय मराठीच्या संवर्धनासाठी मराठीप्रेमींकडून त्यात दान टाकले जाऊ शकते. स्वेच्छेने दहा रुपये किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे रक्कम मराठीच्या या दानपेटीत टाकल्यास चांगला निधी जमा होऊ शकतो, असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या दानपेट्या सुरक्षारक्षक असलेल्या ठिकाणी ठेवल्यास त्या चोरल्या जाणार नाहीत, असाही विचार मांडण्यात आला. त्याची जबाबदारी आयोजकांवर टाकण्यात आली आहे.
>शिक्षकांकडून १५ लाख : संमेलनात सहभागी झाल्याचा शिक्षकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगला उपयोग होतो. त्यामुळे संमेलनात त्यांचा सहभाग विनामूल्य नसावा. संमेलनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना तीन दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे. राज्यभरातील मराठीचे जवळपास ५०० शिक्षक संमेलनात सहभागी होणार असल्याचा दावा संमेलनाच्या आयोजन समितीने केला आहे. त्यांची उपजीविका मराठी भाषेवर आहे. भरपगारी रजेच्या बदल्यात त्यांनी तीन हजार रुपये प्रतिनिधी शुल्क भरावे. ५०० शिक्षकांनी ते भरल्यास किमान पंधरा लाख रुपये संमेलनाच्या खर्चासाठी जमा होऊ शकतात.