हजारो कोटींचा निधी, रेल्वे अधिकारी वेगळ्याच तोऱ्यात; प्रवाशांचे जीव राम भरोसे
By नरेश डोंगरे | Published: October 22, 2024 11:56 PM2024-10-22T23:56:10+5:302024-10-23T00:07:29+5:30
नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून, येथे रेल्वेची मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. यातील दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची कार्यशैली सातत्याने चर्चेचा विषय ठरते.
नरेश डोंगरे
नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या रेल्वे रूटवर हजारो कोटींच्या विकासकामांची गाडी वायुवेगाने धावत असल्याचा सर्वत्र बोलबाला आहे. असे असताना कधी या तर कधी त्या प्रांतात रेल्वे गाड्यांचे अपघात होत आहेत. अपघातासारखा गंभीर प्रकार घडूनही रेल्वे अधिकारी मात्र आपल्याच तोऱ्यात वागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे जीव भगवान भरोसे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
आसाममधील बालासोरमध्ये २ जून २०२३ला रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यात २७८ जणांना जीव गमवावा लागला. शंभरावर जणांना अपंगत्व आले तर, शेकडो जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने रेल्वे प्रशासनाचा कारभार चर्चेचाच नव्हे तर चिंतेचाही विषय ठरला होता. सडकून टीका झाल्यानंतर जागोजागच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर विकासकामांची यादी वाचणे सुरू केले. प्रसिद्धीसाठी पीआरओच्या माध्यमातून रोजच प्रसारमाध्यमांना पाठविणे सुरू केले. त्या माध्यमातून हजारो कोटींच्या विकासकामांचा बोलबाला केला जात असताना रेल्वेच्या भयावह अपघाताबाबत काही अधिकारी बोलण्याचे टाळतात आहे.
आज नागपुरात शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावर घसरले (डीरेल) अन् एक भयावह अपघात होता होता थोडक्यात वाचला. गेल्या तीन-चार महिन्यांच्या डिरेलमेंटच्या घटनांचा विचार केल्यास, जून महिन्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात घडला. काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वेस्थानकावर लोकल डी रेलमेंट झाली. आसाममध्ये आगरतला एलटीटी एक्स्प्रेसचे डबे डिबालोंग स्थानकावर घसरले. यूपीत चंदीगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले. जुलै महिन्यातच झारखंडच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा मुंबई मेलचे १८ डबे पटरीवरून घसरले आणि उत्तर प्रदेशच्याच मथुरेत मालगाडीचे सुमारे २५ डबे घसरले. प्रवाशांना आरामदायक आणि गतिमान प्रवासाची अनुभूती देण्यासाठी हजारो कोटींची रेल्वेची विकासकामे सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात व्हावे, हा प्रकार अस्वस्थ करणारा ठरतो. यातून रेल्वे प्रवाशांचा जीव भगवान भरोसे आहे का, असाही चिंतायुक्त प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिकारी व्यस्त आहेत!
विशेष म्हणजे, नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून, येथे रेल्वेची मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. यातील दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची कार्यशैली सातत्याने चर्चेचा विषय ठरते. खास करून शीर्षस्थ अधिकारी एवढे व्यस्त असतात की त्यांना सामान्य सोडा पत्रकारांशी भेटण्या-बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. मंगळवारी येथे शालीमार एक्स्प्रेसचे डबे घसरून एक भयंकर अपघात होता होता थोडक्यात वाचला. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांना भेटण्याचे सोडा फोनवर बोलण्याचेही साैजन्य दाखविले नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने माहितीसाठी विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी रात्री ९:३० पर्यंत फोनच उचलला नाही तर वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी मला वेळ नाही, म्हणत बोलण्याचे टाळले.
नागभीड चांदा मार्गावरचे प्रकरण
आजच्या शालीमार एक्स्प्रेसच्या अपघाताचे नव्हे तर जून महिन्यात दुसऱ्या एका अशाच अपघात प्रकरणातही अधिकाऱ्यांची भूमिका अशीच होती. दपूम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या नागभीड चांदा फोर्ट मार्गावर एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे भीषण अपघात होणार होता. ऐनवेळी लोको पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो अपघात टळला. या गंभीर प्रकरणाने नागपूर ते दिल्लीपर्यंत खळबळ निर्माण केली होती. मात्र, हे प्रकरण प्रसारमाध्यमात येऊ नये म्हणून दपूमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठी धडपड केली होती.