सर्व शिक्षा अभियानाला निधीची कात्री
By Admin | Published: November 20, 2015 02:03 AM2015-11-20T02:03:58+5:302015-11-20T02:03:58+5:30
२0१५-१६ चा निधी अप्राप्त; बांधकामाच्या संख्येतही कपात.
संतोष वानखडे/ वाशिम: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने कार्यान्वित असलेले सर्व शिक्षा अभियान सद्य स्थितीत अपुर्या निधीच्या कचाट्यात अडकले आहे. २0१४- १५ च्या मंजूर निधीतही ४0 टक्के ह्यबाकीह्ण ठेवून, २0१५-१६ या वर्षातील निधी अद्यापही प्राप्त झाला नाही. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याची ओरड नेहमीच होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यान्वित केले आहे. वर्गखोली बांधकाम, भौतिक सुविधा, विद्युतीकरण अशा सुविधा असणार्या एका वर्गखोलीवर पाच लाख ५0 हजाराची तरतूद केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात ७0 ते १६0 अशा संख्येत वर्गखोलीवर खर्च केला जातो. वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ या वर्षात एकूण १00 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले असून, यावर पाच कोटी ५0 लाखाचा निधी खर्ची पडला. तसेच ८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी रॅम्प बांधण्यात आले. यावर प्रत्येकी २0 हजार रुपये असा एकूण १६ लाख ६0 हजाराचा खर्च झाला. बांधकाम व रॅम्प असा एकूण पाच कोटी ६६ लाख ६ हजाराचा निधी सर्व शिक्षा अभियानाला मिळणे क्रमप्राप्त होते. आतापर्यंत शासनाकडून पहिल्या टप्प्यात एक कोटी व दुसर्या टप्प्यात दोन कोटी असा एकूण तीन कोटी रुपये निधी मिळाला. अजून दोन कोटी ६६ लाखाच्या निधीची प्रतीक्षा आहे. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे २0१५- १६ या वर्षात निधीत कपात केली असून, केवळ दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. शिक्षण विभागाने एकूण ७१ शाळा खोल्यांच्या बांधकामाची मागणी केली होती. २0१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यात शिक्षण विभागाला अद्याप कोणताही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे वर्गखोल्यांचे बांधकाम करावे की नाही, या संभ्रमात शिक्षण विभाग अडकला आहे.