सोहळा फराळाचा!

By admin | Published: October 29, 2016 11:38 PM2016-10-29T23:38:27+5:302016-10-29T23:38:27+5:30

गेले १५ दिवस सुगरणीने राबून केलेल्या फराळावर एव्हाना घरातल्यांनी ताव मारला असेल. आता दिवाळीचे सगळेच पदार्थ जरी कधीही मिळत असले तरी दिवाळीच्या दिवसात

Funeral! | सोहळा फराळाचा!

सोहळा फराळाचा!

Next

- भक्ती सोमण

गेले १५ दिवस सुगरणीने राबून केलेल्या फराळावर एव्हाना घरातल्यांनी ताव मारला असेल. आता दिवाळीचे सगळेच पदार्थ जरी कधीही मिळत असले तरी दिवाळीच्या दिवसात ते करण्याची उत्सुकता आणि मजा वेगळीच असते.

दिवाळीचे हे चार दिवस उत्साहाने, आनंदाने भारलेले असतात. त्यात खरी मजा येते ती फराळाने. खरं तर आजकाल चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळे हे पदार्थ अगदी कधीही मिळतात. पण असे असले तरी दिवाळीच्या दिवसात हे पदार्थ करण्याची मजा काही औरच. घरातल्या गृहिणीची लगबग तर अगदी बघण्यासारखी असते. आमच्याकडे तर माझी आई दिवस ठरवून आजही सगळं फराळाचं करते. पण दिवाळीतले हे पदार्थ करताना इतर दिवसांपेक्षा त्या पदार्थांवर प्रेम जरा जास्तच असतं. म्हणून तर फराळ करणं हा घराघरात सोहळाच होऊन जातो. मग अगदी फोनवर किंवा मुलांच्या शाळेतही मैत्रिणी भेटल्या की फराळ कामांच्या गप्पाच जास्त असतात. एखादीची गेल्यावर्षीची चकलीची चव आवडते म्हणून तशीच चकली करण्याची धडपडही केली जाते.
महाराष्ट्रात कुठेही जा हे फराळ करण्याची आपली आपली खासियत आहे. त्या भागात राहणारी मंडळी जर दुसरीकडे स्थलांतरित झाली तर दिवाळीच्या दिवसांत त्यांना जाम चुकल्यासारखे वाटते. काही महिन्यांपूर्वी नागपूरहून पुण्यात स्थलांतरित झालेल्या माझ्या पद्मजा काकूची मनाची अवस्था अगदी तशीच आहे. नागपूरला त्यांच्याकडे एक दिवस ठरवून पंडित (आचारी) यायचा. फक्त त्यांचाच नाही तर आणखी चार घरचा फराळ तो एका दिवसात आणि तोही चविष्ट करायचा. तो आला की पहिल्यांदा लाडू करायचा. मग ते सारण गार झालं की या चार घरातल्या बायका लाडू वळायला बसत. मग चकली, भरपूर चिवडा, चिरोटे.... दिवसभर त्या फराळाच्या सुगंधाने घर भारलेलं असायचं. ही आठवण सांगताना काकूचा कातर स्वर फराळाशी आपण किती एकरूप झालो आहोत हेच सांगत होता. फराळाशी निगडित अशा किती तरी आठवणी अनेकांच्या जोडल्या गेलेल्या असतील.
काळाच्या ओघात घरातली गृहिणी कमावती झाली. मोठ्या हुद्द्यावर पोहोचली. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात तिला आई-सासूप्रमाणे साग्रसंगीत फराळ करायला जमेल याची शाश्वती नाही. त्यामुळेच की काय आता रेडिमेड फराळाकडे महिलांचा ओढा वाढला आहे. यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळतो आहे. थोडक्यात काय तर फराळ घरी केलेला असो वा बाहेरचा, त्याची मजा दिवाळीच्या दिवसात जास्त असते. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत केलेला फराळ आणि कल्ला याची आठवण पुढच्या दिवाळीपर्यंत पुरते. हो ना!

बेक्ड फराळाचेही दिवस
आजकाल वेगळ्या पद्धतीने पदार्थ केला की तो उत्सुकतेने खाल्ला जातो. त्यामुळेच की काय बेक्ड केलेला फराळही आता बनू लागला आहे. हा बेक्ड फराळ डाएट करत असलेले लोकही खाऊ शकत असल्याने त्याकडे तरुणाईचा ओढा जास्त वाढला आहे. या प्रकारांमध्ये प्रामुख्याने बेक्ड चकली, करंज्या, तिखट-मिठाचे शंकरपाळे, रव्याचा चिवडा, शेव असे अनेक प्रकार येतात. बेक्ड चकलीत जर चवीत फरक करायचा असेल तर त्यात कोथिंबीर पेस्ट, लसूणही घालावी. चकलीसाठी नेहमी करतो त्या सारणात कोथिंबीर, लसूण घालायची. सर्व सारण एकत्र केलेल्या गोळ्याची चकली पाडून ती १०-१५ मिनिटे बेक करायची. अशीही चकली फार खुसखुशीत लागते. असेच इतरही पदार्थांचे करता येते. दिसायलाही हे पदार्थ आकर्षक दिसतात. बदलत्या दिवाळीच्या वातावरणात मात्र, या बेक्ड प्रकारांकडे अधिक सकारात्मक बघायला हवे.

Web Title: Funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.