कर्नल महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: November 19, 2015 12:11 PM2015-11-19T12:11:38+5:302015-11-19T12:16:26+5:30
जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. १९ - जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साता-यातील पोगरवाडी या महाडिक यांच्या मूळगावी कुटुंबियांसह हजारो गावक-यांनी साश्रूनयनांनी महाडिक यांना अखेरचा निरोप दिला. दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सकाळी कर्नल महाडिक यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. कर्नल महाडिक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (३९) शहीद झाले होते. जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर कर्न महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम हाती घेण्यात आली, दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाडिक यांच्यासह चार जवान जखमी झाले होते. मात्र उपचारांदरम्यान कर्नल महाडिक शहीद झाले.
त्यानंतर श्रीनगर येथील बेस कँपवर त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली व पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने काल महाडिक यांचे पार्थिव पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. अखेर आज साताऱ्याच्या जिल्हा रूग्णालयात आणि आरेदारे गावात त्यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी पोगरवाडी येथे हजारो गावक-यांच्या उपस्थितीत, लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.