हजारो कामगारांच्या उपस्थितित लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार
By Admin | Published: September 3, 2016 05:27 PM2016-09-03T17:27:54+5:302016-09-03T17:27:54+5:30
हजारो कामगारांच्या उपस्थितीत लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर आज दुपारी अडीचच्या सुमारास ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - हजारो कामगारांच्या उपस्थितीत लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर आज दुपारी अडीचच्या सुमारास ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पूत्र आणि कामगार नेते शशांक राव यांनी आपल्या वडिलांच्या चितेला अग्नि दिला. त्यानंतर येथे झालेल्या शरद राव यांच्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली अशी माहिती म्युन्सिपल कामगार युनियनचे चिटणीस गोविंद कामतेकर यांनी दिली.
गेल्या गुरुवारी दुपारी ४ वाजता त्यांचे विलेपार्ले(प)येथील नानावटी इस्पितळात निधन झाले होते.काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी गोरेगांव(प)बांगूर नगर येथील जलनिधी सोसायटीमधील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चिरंजीव व कामगार नेते शशांक राव आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
आज सकाळी हजारो कामगारांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या बांगूर नगर येथील निवासस्थानापासून निघाली.तत्पूर्वी सकाळी ८ वाजता त्यांचं पार्थिव देह त्यांच्या जलनिधी सोसायटीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.आपल्या या लाडक्या कामगार नेत्याचे हजारो कामगारांनी रांग लाऊन साश्रुपूर्ण नयनानी अंत्यदर्शन घेतले.शिक्षण मंत्री आणि उपनगर पालक मंत्री विनोद तावड़े,उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे निबांळकर,खासदार गजानन कीर्तिकर,खासदार हुसेन दलवाई,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम,माजी कामगार राज्यमंत्री व कामगार नेते सचिन अहिर,राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक,कामगार नेते आमदार भाई जगताप,कामगार नेते भूषण सामंत,कोलकत्तावरुन आलेले कामगार नेते नूर अहमद,नागपूरवरुन आलेले कामगार नेते शब्बीर अहमद विद्रोही,दिल्लीवरुन आलेले कामगार नेते हरभजनसिंग सिंधु आणि अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.