संतप्त नातेवाईकांनी पतीच्या घरासमोर केला विवाहितेचा अंत्यसंस्कार
By Admin | Published: July 27, 2016 07:37 PM2016-07-27T19:37:31+5:302016-07-27T19:37:31+5:30
सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २७ : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले.
बंडू शेषेराव गाडे (रा. ठाकरआडगाव ता. गेवराई) यांची मुलगी छाया हिचा विवाह चार वर्षांपूर्वी लक्ष्मण कदम याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही वर्षे सुखाची गेली; परंतु नंतर हुंड्यातील राहिलेले २५ हजार रुपये व एक तोळ्याची अंगठी घेऊन ये या कारणावरुन तिचा छळ सुरु झाला. या छळाला कंटाळून छायाने (वय २५) सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राहत्या विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळ माहेरकडील मंडळींनी तिने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाल्याचा आरोप करुन जिल्हा रुग्णालयातच सासरकडील मंडळींना चोप दिला. बराच वेळ गोंधळ सुुरु होता.
सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास माहेरकडीलल लोेकांनी नकार दिला. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. पती लक्ष्मण कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयत छायाचे वडील बंडू गाडे यांच्या फिर्यादीवरुन तलवाडा ठाण्यात लक्ष्मण कदम, सासू शांता कदम, दीर भरत कदम, मोहन कदम यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सिरसदेवी येथे नेण्यात आला. माहेरचे लोक आक्रमक झाल्याने सासरकडील मंडळी पसार झाली.
दरम्यान, माहेरकडील मंडळी संतप्त होती. अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत न करता सासरकडील दारातच करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. पोलिसांच्या उपस्थितीत छायावर मोहरकडील नातेवाईकांनी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. पती लक्ष्मण यास बुधवारी पोलिसांनी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे, असे फौजदार आर. आर. गडवे यांनी सांगितले.
चिमुकली उघड्यावर
मयत छायाला तीन वर्षांची श्रद्धा नावाची मुलगी आहे. तिचा पती लक्ष्मण हा शेती करतो, तसेच गावात त्याचे मोबाईल दुरुस्ती व विक्रीचे दुकान आहे. छायाच्या आत्महत्येने तिची मुलगी मातेच्या ममतेचा पारखी झाली आहे तर तिचे वडील आईच्या आत्महत्येस जबाबदार म्हणून जेरबंद झाले असून श्रद्धा उघड्यावर आली आहे.