सैनिक नितीन गंधे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 06:15 PM2018-08-22T18:15:56+5:302018-08-22T18:17:57+5:30
इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धामणगाव रेल्वे (अमरावती) - इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लखाड येथील रहिवासी असलेले नितीन गंधे यांचा पुण्यातील साऊथ कमांड हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी विशेष हेलिकॉप्टरने बेलोरा व तेथून सैन्य दलाच्या वाहनाने जुना धामणगाव येथे आणण्यात आले. यावेळी ‘अमर रहे - अमर रहे, नितीनभाऊ अमर रहे’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषात संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. पुलगाव येथील आॅर्डिनन्स डेपोच्या १० जवानांच्या एका तुकडीने मानवंदना दिली. यावेळी ब्रिगेडियर प्रदीपसिंग यांच्यासह दोन मेजर, जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. आ. वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष प्रताप अडसड, तहसीलदार अभिजित नाईक, गटविकास अधिकारी पंकज भोयर, सरपंच जयश्री पोळ, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी व सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हा सैनिक अधिकारी फ्लाइट रत्नाकर चरडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर मृत नितीन यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वज त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला. चुलतभाऊ सुमीत यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. जवान नितीन गंधे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा अर्णव (७) व एक वर्षाची मुलगी भाविका, मोठा भाऊ असा आप्तपरिवार आहे.
खेळात प्रावीण्य
२००३ मध्ये पुण्यातील बी.ई.जी. खडकी येथून सैन्यात दाखल झालेले नितीन गंधे यांनी इंजिनीअरिंग रेजिमेंट-११९ ची जबाबदारी सांभाळली होती. ते बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेनिस खेळात अव्वल होते. रोइंग, शेरे सपर्स पथकात त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. झाशी , भटिंडा, पतियाळा, लेह-लद्दाख अशा विविध ठिकाणी इंजिनीअरिंग रेजिमेंट-११९ व १२२ मध्ये त्यांनी सेवा दिली.
यांनी वाहिली श्रद्धांजली
याप्रसंगी श्रद्धांजली वाहताना आ. वीरेंद्र जगताप म्हणाले, नितीन गंधे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनीही विचार मांडले. याप्रसंगी वेलफेअर अधिकारी सुभेदार पठारे, माजी सैनिक संघटनेचे धामणगाव रेल्वे तालुका संघटक दिलीप दगडकर, माजी सैनिक संघटना (धामणगाव रेल्वे) अध्यक्ष कॅप्टन अशोक महाजन, सुभेदार आडे, नरेश इंगळे, प्रशांत वैरागडे, झोडगे, वैद्य, सुभेदार शिंगणजुडे, मिरगे, श्रीखंडे, ठाकरे, मोकुलकर, गंधे, पडोळे, सुभेदार पाटणे यांनी आदरांजली वाहिली.