वेदनादायी! माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या गावात गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:53 PM2022-08-12T12:53:53+5:302022-08-12T12:54:35+5:30
मागील अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे होता
चंद्रपूर - एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विदारक स्थिती पुढे आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मूळ गावात नाल्यावर पूल नसल्यानं गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. वडेट्टीवारांची जन्मभूमी असलेल्या करंजी गावात रवी आत्राम यांचं गुरुवारी निधन झालं.
करंजी गावात असणारा नाला पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. परंतु या नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यातच गुरुवारी आत्राम यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा गावकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली. हा वेदनादायी प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. विकासाच्या बाता करणारे राजकारणी त्यांच्याच गावातील विकास करू शकत नसल्याची खंत अनेकांनी मांडली.
मागील अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे होता. त्याचसोबत चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र वडेट्टीवारांच्या जन्मगावीच विकासाचा दावा फोल ठरल्याचं करंजी येथील घटनेने उघड झालं आहे. गावातील लोकांना नाल्यातून वाट काढताना कसरत करावी लागते. गुरुवारी अत्राम यांच्या अंत्ययात्रेला गावकरी आमराईतील नाला ओलांडून जात होते. पावसामुळे आमराई नाला ओसांडून वाहत आहे. मात्र नाल्यावर पूल नसल्यानं हा प्रसंग गावकऱ्यांवर आला आहे.
करंजी गावातील लोकसंख्या ५ हजारांच्या वर आहे. याठिकाणी स्मशानभूमीला जाताना नाला ओलांडावा लागतो. त्यामुळे गावकऱ्यांनी नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी वारंवार केली. ग्रामपंचायतीत हा ठराव मांडला परंतु अद्यापही मागणी पूर्ण झाली नाही. अलीकडेच काँग्रेसनं करंजी गावातून आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ केला. त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे तिन्हीही आमदार उपस्थित होते. त्यानंतर घडलेल्या या प्रसंगामुळे अनेकांचं या समस्येवर लक्ष केंद्रीत झाले आहे. मागील महिनाभरापासून विदर्भात पाऊस खूप पडतोय. जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी आहे. गावच्या गावं आणि शेतही पाण्याखाली आहे. त्यात मृत माणसाची अंत्ययात्रा नेतानाही गावकऱ्यांना पूल नसल्यानं जीवघेणा मार्ग पत्करावा लागल्याचं चित्र समोर आले आहे.