शहीद गावडेंवर आज अंत्यसंस्कार
By admin | Published: May 24, 2016 02:57 AM2016-05-24T02:57:57+5:302016-05-24T02:57:57+5:30
आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आंबोली (जि.सिंधुदुर्ग) : आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. काहीकाळ पार्थिव घरात ठेवून सकाळी अकरा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुपवाडा जिल्ह्णातील चकड्रगमुल्ला येथे शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्यांचे श्रीनगर येथील रुग्णालयात निधन झाले. याबाबतची माहिती रविवारी सकाळी गावडे कुटुंबाला देण्यात आली होती. शहीद गावडे यांचे पार्थिव सोमवारपर्यंत येईल, असे यावेळी कुटुंबाला सांगण्यात आले होते.
मात्र, सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली. अंत्यसंस्कारासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा दौरा कार्यक्रम प्रशासनाकडे आला नव्हता. बेळगाव येथील १४ मराठा लाईफ इन्फन्ट्रीचे शंभर जवान सोमवारीच आंबोलीत आले आहेत. (प्रतिनिधी)