शहीद प्रेमदास मेंढे, मंगेश बालपांडे व नंदकुमार आत्राम यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Published: March 13, 2017 04:17 AM2017-03-13T04:17:00+5:302017-03-13T04:17:00+5:30
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली
वर्धा/भंडारा/चंद्रपूर: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली. मृतात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे (३४) , वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथील प्रेमदास मेंढे व चंद्रपूर जिल्ह्यातल्या नंदकुमार आत्राम यांचा समावेश होता. या तिन्ही जवानांच्या पार्थिवांवर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मंगेश बालपांडे यांच्या पश्चात आई प्रमिलाबाई, पत्नी शीतल, मुलगी पलक (४ वर्षे) व मुलगा गंधर्व (११ महिने) आहेत.
रविवारी सकाळी ८.३० वाजता शहीद मंगेश यांचे पार्थिव भंडारा पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. त्यानंतर तुमसर येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शहीद मंगेश यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार चरण वाघमारे यांनी केली. यावेळी तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे रविवारी दुपारी शहीद प्रेमदासचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारी पंचधारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज दुपारी १२.३० वाजता केंद्रीय राखीव दलाचे कमांडिंग आॅफिसर मनोज ध्यानी, पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनात राखीव दलाच्या एका तुकडीने विशेष वाहनातून शहिदाचे पार्थिव आणले. लगतच्या सोनोरा (ढोक) या गावातील प्रेमदास मेंढे १९९९ च्या बॅचमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीत शासकीय सेवेत दाखल झाले. यानंतर त्याचे कुटुंबिय मुलांच्या शिक्षणासाठी पुलगाव येथे स्थलांतरीत झाले. यावेळी त्यांचा मुलगा आर्यन, मुलगी कुंजन, पत्नी हर्षदा, वृद्ध आई-वडील होते. खा. रामदास तडस यांनी पार्थिवावर केंद्र शासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करीत कुटुंबियांचे सांत्वन केले.
याप्रसंगी सीआरपीएफ पोलीस दलाच्या एका तुकडीने २१ बंदुकांची फैरी झाडून मानवंदना दिली. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाद्वारे उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुष्पचक्र अर्पण केली. यावेळी खा. तडस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक डी.ही. हिरुरकर, उपनिरीक्षक मुरलीधर ठवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र किल्लेकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सरपंच सविता गावंडे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुरांडे, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, सुनीता राऊत, गजानन राऊत, पुंडलिक पांडे, नितीन बडगे, विनोद माहुरे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले. त्यांचे पार्थिव चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथे रविवारी आणल्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)