मोर्चापाड्यात जीवघेणी कसरत
By admin | Published: July 18, 2016 04:02 AM2016-07-18T04:02:39+5:302016-07-18T04:02:39+5:30
तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस
हुसेन मेमन,
जव्हार- तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस आल्याने, विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या धोक्कादायक पुलावरूनच ये-जा करावी लागत आहे.
मोर्चापाडा व दसकोड नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूने पक्के व चांगले रस्ते आहेत. मात्र पुलाची दुरुस्ती नसल्याने, पूर्ण पूल गंजून मोडून गेला आहे. त्यामुळे या धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी, येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
जव्हार तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड या दोन गावांमध्ये ४ कि. मी. अंतर असून, मोर्चापाडा येथे पावसाळ्यात एसटी बस येत नसल्याने येथील शाळेत व कॉलेजला जाणारे विद्यार्थी व नागरिकांना बस गाठण्यासाठी दसकोड गावात जावे लागत आहे. मात्र मोर्चापाडा व दसकोड या गावाजवळील नदीवर ३५ ते ४० वर्षापूर्वी लोखंडी पुलाचे बांधाकाम करण्यात आले आहे. परंतु हा लोखंडी पूल जुनाट होऊन, गंजून गेल्याने, पूर्ण पूल जीर्ण होऊन मोडून गेला आहे.
दसकोड पुलावरून यापूर्वी जीप, मोटारसायकल, ट्रक्स, याची वाहतूक सुरू होती. मात्र, या पुलाला अनेक वर्ष होऊनही दुरुस्ती नसल्याने, हा पूल धोकादायक बनला आहे. तरीही येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने, या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. मोर्चापाडा येथील विद्यार्थ्यांना नाइलाजाने रोज याच मोडकळीस पुलावरून विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला ये-जा करावे लागत आहे. दसकोड गावात येणारी एसटी बस गाठण्यासाठी याच मोडकळीस व धोकादायक पुलावरून पायी प्रवास करावा लागत आहे.
मोर्चापाडा येथील नागरिकांना कामानिमित्त व विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी या मोडकळीस पुलावरून जायचं नसेल, तर ११ कि.मी. पायी प्रवास करून मेढा येथे एसटी बसवर जावे लागत आहे.
मोर्चापाडा व दसकोड नदीवरील धोकादायक पूल गेल्या अनेक वर्षापासून दुरु स्तीला आला आहे. या पुलापर्यंत दोन्ही बाजूने चांगले रस्ते आहेत. मात्र नदीवरील पूलच नादुरुस्त व मोडकळीस असल्याने, विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले आहेत. तरीही जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून ये-जा करावी लागत आहे.
येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. याचा मोठा फटका येथील नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे.