फ्रान्सची फ्युनिक्युलर सप्तशृंगीगडावर, अवघ्या तीन मिनिटात दर्शन
By admin | Published: May 2, 2016 04:45 PM2016-05-02T16:45:37+5:302016-05-02T16:54:41+5:30
आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ३ - आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. फ्युनिक्यूलर ट्रॉली या ट्रॅकवर चढविल्या असून, त्यांची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने गडाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
कोलकाता येथून ट्रॉली आणण्यात आल्या असून, संपूर्णपणे वातानुकूलित या ट्रॉलीला जाण्या-येण्यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत व चाचणी घेण्यासाठी परदेशातून अभियंते बोलविण्यात आले आहेत. त्यासाठी अंदाजे एक ते दोन महिने या ट्रॉलीची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सुयोग गुरुबक्षाणी कंपनीचे व्यवस्थापक लुंबा यांनी दिली.
फ्युनिक्यूलर ट्रॉली हा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. यामुळे महिला, अपंग वृद्ध, भाविकांची गैरसोय थांबून त्यांचा मंदिरार्पयतचा प्रवास सुखकर आणि अवघ्या तीन मिनिटात होणार आहे.
सप्तशृंग देवीचे मंदिर डोंगरकडय़ाच्या मध्यभागी आणि पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असून, भाविकांना मंदिरात ५५० पाय-या उंच चढून जावे लागते. गडावर जाण्यासाठी वृद्ध, अपंग, आजारी, गर्भवती महिलांना त्रसदायक ठरत आहे. सदर भाविकांना सुलभ पर्याय म्हणून फ्युनिक्यूलर ट्रॉलीचा पर्याय शोधण्यात आला. ही ट्रॉली १.५ मीटर रुंदीच्या आणि २५० मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरून जाणा-या इलेक्ट्रिक ट्रेनसारखी असणार आहे.
येण्या-जाण्याच्या अशा दोन मार्गावर प्रत्येकी एक ट्रॉली धावणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना उतरण्यासाठी रुळाच्या एका बाजूने पाय-या बसविण्यात आल्या आहेत. विद्युतीकरणावर चालणारी ही ट्राली सिस्टीम डोंगरात उभारली गेली असून, येथेही कोकण रेल्वे पॅटर्ननुसार संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रवासी प्रतीक्षालय, बुकिंग ऑफिस, स्टाफ रूम, वेटिंग प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, शौचालय, हॉटेल व इतर सुविधा असणार आहेत.
फ्युनिक्युलेरची सुरुवात फ्रान्समध्ये
फ्युनिक्युलेर ही रहाटा प्रमाणे पुलिवर मानवी वाहतूक करण्याची व्यवस्था आहे. याची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. आलप्स पर्वतरांगांमध्ये ग्रीनोबल या विंटर ऑलिम्पिक सेंटरच्या जवळ त्याची सुमारे ९० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मिनी ट्रेन सदृश बाकांवर माणसे बसवून ते पुलिच्या सहाय्याने वर-खाली केले जातात. त्याच्या रुळांचा कोन ८० अंश म्हणजे जवळपास काटकोनात उभा असतो. या तंत्रज्ञानाचा अवलंब रोपवे पेक्षाही प्रभावी पद्धतीने करता येणे शक्य असल्याने महाराष्ट्रात नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर आणि कल्याणजवळ मलंगडावर चाचणी करण्याची कल्पना पुढे आली.