भिवंडीत चार अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त
By admin | Published: May 19, 2017 02:25 AM2017-05-19T02:25:02+5:302017-05-19T02:25:02+5:30
भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली.
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १७ लाख ५४ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अनधिकृत एक्सचेंजमुळे केंद्र सरकारचा ३० कोटींपेक्षा अधिक महसूलाचे नुकसान झाले असून त्याचा देश विघातक कारवायांसाठीही उपयोग केला किंवा कसे याबाबतचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुफियान अन्सारी, इकबाल सुलेमान, मो. अस्लम शेख आणि युनूस हाज्मी आदी पाच जणांना अटक याप्रकरणी अटक झाली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे टेलिफोन एक्सचेंज सुरू करुन परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी (व्हॉईस आॅव्हर इंटरनेट प्रॉटोकॉल) कॉल हे अनधिकृत सीम बॉक्सचा वापर करुन त्यात भारतीय कंपनीचे सिम कार्डस वापरुन भारतातील इच्छित मोबाईल क्रमांकावर केले जात असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने केंद्रीय टेलिकम्युनिकेशन विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध पथके तयार करुन १७ मे रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास आरोपींच्या घरी तसेच त्यांच्या टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून त्यांना अटक केली. या कारवाईत १८ सिम बॉक्सेस आढळले. या बॉक्सेस मध्ये रिलायन्स आणि टाटा डोकोमो या कंपनीचे सुमारे ४२० सिमकार्डस मिळाले. सिमबॉक्स हे इंटरनेट कनेक्शनला राऊटरच्या मार्फतीने जोडले होते. तसेच या यंत्रामध्ये बसविलेल्या विविध सिमकार्डद्वारे परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल भारतीय मोबाईल क्रमांक तथा दूरध्वनी क्रमांकाशी जोडले जात होते. तसेच आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी वॉईस कॉल हे सेल्युलर नेटवर्कमध्ये डोमॅस्टीक (देशांतर्गत) कॉल म्हणून जोडले जात होते. त्यामुळे भारतातील मोबाईल क्रमांकाच्या डिस्प्लेवर परदेशातील मोबाईल क्रमांक न येता भारतातील मोबाईल कंपनीचे क्रमांक यायचे. हे फोन कोणत्याही सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. या कॉल्सची नोंद टेलिकम्युनिकेशन विभागाकडेही (डिओटी) होत नसल्याने भारत सरकारचा आतापर्यंत ३० कोटींचा महसूलही बुडाल्याचे उघड झाले आहे.
देशविघातक कारवायांसाठी वापर?
- अशा अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे होणाऱ्या कॉलचा वापर देशविघातक आणि इतर अवैध बेकायदेशीर कामांसाठी केला जाण्याची शक्यताही सिंग यांनी वर्तविली.
ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर असून, याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, भारतीय टेलिग्राफ कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
या संपूर्ण टेलिफोन एक्सचेंजची यंत्रणा राबविणाऱ्या टोळीचा म्होरक्या टाटा आणि रिलायन्सचा माजी कर्मचारी आहे. त्याचाही आता कसून शोध घेण्यात येत आहे.
हवालासाठी उपयोग?
अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांमधून या टेलिफोन केंद्रावर कॉल्स येत होते. अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नसली तरी गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांसाठी तसेच हवालामार्फत येणाऱ्या पैशांसाठीही या कॉल सेंटरचा उपयोग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विदेशातून येणाऱ्या या कॉल्सचा कोण वापर करीत होते? यामागे आणखी कोणती टोळी कार्यरत आहे का? या सर्व बाबींचाही तपास करण्यात येत आहे.