मेमध्ये उत्पादन क्षेत्रात आणखी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 04:43 AM2020-06-02T04:43:15+5:302020-06-02T04:43:35+5:30
पीएमआय ३०.८ वर : नोकरकपात वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील घडामोडी मे महिन्यात आणखी घसरल्या आहेत. वस्तू उत्पादनात आणखी घट झाल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकरकपातीत वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे एका मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) मे महिन्यात ३०.८ वर राहिला. एप्रिलमध्ये तो २७.४ वर होता. या क्षेत्राची प्रकृती चिंताजनक असल्याचेच हे आकडे सांगत आहेत.
एप्रिलमध्ये इंडेक्स संकोच पावला होता. त्याआधी सलग ३२ महिने तो वाढ दर्शवत होता. ५० वरील इंडेक्स वाढ, तर ५० खालील इंडेक्स घसरण दर्शवितो. ताज्या पीएमआय डेटावरून असे सूचित होते की, वस्तू उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात मे महिन्यात आणखी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये लॉकडाउनमुळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंद राहिल्यामुळे पीएमआय मध्ये विक्रमी घसरण झाली होती, असे आयएचएस मार्किटचे अर्थतज्ज्ञ एलियॉट केर यांनी सांगितले.
सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, एप्रिलमधील विक्रमी घसरणीनंतर मे महिन्यातही मागणी कमजोर राहिल्यामुळे उत्पादनात घसरण झाली आहे. या क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकर कपातीत वाढ करण्यात आली आहे. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. १५ वर्षांपूर्वी आकडेवारीचे संकलन सुरू झाले, तेव्हापासून सर्वाधिक नोकर कपात आता होत आहे. केर यांनी सांगितले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी उद्योगांसमोर मोठी आव्हाने आहेत, असे यातून स्पष्ट होते. मागणी वाढलेली नाही. कोविड-१९ साथ आणखी किती दिवस चालणार याबाबत अनिश्चितता आहे.