"पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:32 PM2024-08-18T16:32:44+5:302024-08-18T16:33:31+5:30
Chhagan Bhujbal Criticize Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणूक लढवण्यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मराठा समाजाला ओबीसींमधून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वेळोवेळी तीव्र विरोध केलेला आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी उडत असतात. आता विधानसभा निवडणूक लढवण्यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर टिप्पणी करताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्ही आता विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करा. त्यासाठी जरा वेळ घ्या. मला शिव्या देऊन माझ्याविरोधात उमेदवार उभे करून काही फायदा नाही. तुमचे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार. मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार. आणखी पण काय काय होणार. मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यावर शिव्याशाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच वागणं सुधारलं पाहिजे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.