एलईडी लाईटच्या वापरावरून रत्नागिरीत मच्छीमारांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:04 PM2018-01-10T18:04:38+5:302018-01-10T18:15:18+5:30
समुद्रात एलईडी लाईटद्वारे सुरू असलेल्या मोसमारीवरून मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटला आहे . ही मासेमारी तत्काळ बंद करावी अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल.
रत्नागिरी - समुद्रात एलईडी लाईटद्वारे सुरू असलेल्या मोसमारीवरून मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटला आहे . ही मासेमारी तत्काळ बंद करावी अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल. मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा हर्णै येथील मच्छीमारांनी सहायक मत्स्य आयुक्त रत्नागिरी यांना बुधवारी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आ. बा. साळुंखे यांना रत्नागिरी येथे याबाबत निवेदन दिले.
यावेळी एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे प्रतिनिधीही मत्स्य कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमल्याने संघर्ष उडण्याची शक्यता होती. मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दोन्ही बाजूच्या मच्छीमार प्रतिनिधींनी संयमाची भूमिका घेतल्याने संघर्ष टळला.
दोन्ही मच्छीमार गटांचे नेते , प्रतिनिधी, मच्छिमारी संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन दोन्ही मच्छीमार गटांना जगवण्याचे धोरण या सभेत ठरविले जाणार आहे, असे आमदार संजय कदम यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात बारा नॉटिकल क्षेत्राबाहेर एलईडी मासेमारीला पूर्णतः बंदी आहे. मात्र राज्याच्या १२ नॉटीकल पर्यंतच्या जलधी क्षेत्रात एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्याबाबत शासनाची कोणतीही अधिसूचना नाही. या क्षेत्रात एलईडी लाईटचा वापर करावा की नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेऊन तो राज्य शासनाला कळवायचा आहे , अशी माहिती रत्नागिरीचे सहायक मत्स्य आयुक्त आ. बा. साळुंखे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.