खडकीत पाण्यासाठी संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 01:09 AM2016-08-04T01:09:42+5:302016-08-04T01:09:42+5:30
खडकवासला वितरिका क्रमांक ३२, ३४ व ३५ ला पाणी न सोडल्यामुळे खडकी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला
राजेगाव : खडकवासला वितरिका क्रमांक ३२, ३४ व ३५ ला पाणी न सोडल्यामुळे खडकी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कारभारामुळे खडकीच्या ग्रामस्थांवर पाण्याबाबत सतत अन्याय होत आलेला आहे. या परिसरातील वितरिका क्रमांक ३२, ३४ व ३५ ला पाणी सोडण्याची वारंवार विनंती करूनही प्रत्येक वेळी जाणिवपूर्वक अन्याय होत आहे.
सध्या ऐन पावसाळ्यात खडकी गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून सध्या शासनाच्या टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या सुरू असलेल्या आवर्तनामध्ये पाटबंधारे विभागाने फाटा क्रमांक ३५ वरून स्वामी- चिंचोलीचा तलाव भरून दिला. पण खडकी येथे पाणी आले असता अचानक पाणी बंद करून खडकीला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीही ऐन उन्हाळ्यात अशाच प्रकारे खडकी गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. खडकवासला पाटबंधारे विभागाकडून खडकी ग्रामस्थांवर अन्याय करण्याची भूमिका वारंवार घेतली जात आहे. यापूर्वी पुणे येथे १८ फेब्रुवारीस जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मीटिंगमध्ये खडकवासला पाटबंधारे विभागाला सूचना करूनही त्यांनी जाणिवपूर्वक खडकी येथील जनतेवर अन्याय केलेला आहे, अशी खडकी येथील जनतेची भावना झाली असून येथील जनतेमध्ये तीव्र उद्रेक निर्माण झाला आहे. ४ आॅगस्टपर्यंत पाटबंधारे विभागाने खडकी गावाला पाणी न सोडल्यास ५ आॅगस्ट रोजी मोठे जनआंदोलन उभे करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर खडकीचे सरपंच किरण काळे यांची सही आहे.
>या भागातील शेतीसाठी आॅगस्टपासून वर्षभरात एकही आवर्तन मिळाले नाही. फेब्रुवारीमध्ये गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी पोहोचले नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारीस ग्रामस्थांच्या वतीने पुणे - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने १०८ जणांवर गुन्हे दाखल केले. तरीही पाणी मिळाले नव्हते.
- किरण काळे, सरपंच, खडकी