अंतराळ क्षेत्रात देशाचे भविष्य उज्ज्वल
By admin | Published: January 15, 2015 12:59 AM2015-01-15T00:59:08+5:302015-01-15T00:59:08+5:30
केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे.
प्रकाश मुजुमदार : ‘इन्स्पायर’मध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नागपूर : केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे. येणाऱ्या काळात अंतराळ क्षेत्रात देशाचे भविष्य उज्ज्वलच राहणार आहे, असे प्रतिपादन ‘इस्रो’चे माजी सल्लागार डॉ. प्रकाश मुजुमदार यांनी केले.
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात त्यांंनी बुधवारी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला.
डॉ.मुजुमदार यांनी यांनी ‘जर्नी आॅफ इंडियन सायन्स विथ स्पेसिफिक आॅफ इस्रो’ या विषयावर भारतीय विज्ञानाची विज्ञान क्षेत्रातील प्रगती व राष्ट्राला झालेला उपयोग यावर प्रकाश टाकला. देशात १९४६ पासून विज्ञानाच्या सकारात्मक कक्षांचा विस्तार सुरू झाला.
देशात ‘इस्रो’ची स्थापना झाली आणि २१ फेब्रुवारी १९६९ ला अग्निबाणचे प्रक्षेपण झाले. या दोन्ही घटना भारताच्या उज्वल अंतराळ प्रवासाची नांदी ठरल्या, असे ते म्हणाले. ‘जीएसएलव्ही’चे निरनिराळे टप्पे तसेच निरनिराळ्या अग्निबाणांसंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या प्रश्नांनादेखील त्यांनी उत्तरे दिली.
त्याअगोदर झालेल्या सत्रात मुंबई येथील सोमय्या कॉलेज आॅफ सायन्सचे डॉ. दीपक मोरे यांनी भौतिकशास्त्रावर मार्गदर्शन केले. यातील मूलभूत संकल्पनाची जोड जीवनातील घडामोडीशी घालून राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोगात कसे आणता येईल याचा मूलमंत्र दिला.
तिसऱ्या सत्रात हिस्लॉप महाविद्यालयाचे गणित विज्ञान प्रमुख प्रा. रुषी अग्रवाल यांनी ‘गणित दर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शाम दारोकार, प्रा.जीवन मधुगिरी, प्रा.दीपक कडू यांनी या तिन्ही सत्रांचे संचालन केले. (प्रतिनिधी)